
लातूर – सर्वच पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात महाराष्ट्रात सुव्यवस्थेचे राज्य आणण्याचा निर्धार केला आहे. मात्र या गेल्या काही दिवसांत प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात ठाकल्याचे दिसून आले. त्यात भर रस्त्यावर हाणामाऱ्या, राडेबाजी या सगळ्यांचाच प्रत्यय स्थानिक मतदारांना पाहायला मिळाला. दरम्यान लातूरमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीवर लातूरकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काल प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने शहरात सर्वच पक्ष प्रचारात व्यस्त होते. त्यावेळी भाजप उमेदवार शैलेश लाहोटी आणि काँग्रेसचे नगरसेवक दिपक सूळ एकमेकांसमोर आले. त्यावेळी काही शुल्लक कारणावरुन वाद झाल्याने दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी या मारहाण करणाऱ्यांचा शोध सुरू आहे.
प्रचारादरम्यान लातूर, वसईत राजकीय कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
दरम्यान वसई विधानसभा मतदारसंघात हितेंद्र ठाकूर आणि विवेक पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होऊन चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काही महिलांचाही समावेश असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वसई मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि आमदार विवेक पंडित हे एकमेकांविरोधात निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक ठाकूर आणि पंडित यांच्या अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. नायगाव परेरा नगरमध्ये बहुजन विकास आघाडी आणि आमदार विवेक पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचारादरम्यान शाब्दिक बाचाबाची झाली. पुढे या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत झाले.
