पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार

prithviraj-chavan
यवतमाळ – १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दूरचित्रवाणी आणि वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित होणा-या जाहिरातींमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आचारसंहितेच्या उल्लंघनासोबतच महाराष्ट्रातील मतदारांची फसवणूक करीत असल्याने, त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशा आशयाची तक्रार राष्ट्रीय रक्षक परिवार संघाचे अध्यक्ष व पत्रकार विलास वानखेडे यांनी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता १५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मतदान होत आहे. यावेळी काँग्रेस पक्षालाच मतदान करा असे आवाहन असलेल्या या जाहिरातीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे स्वतःविषयी आभास निर्माण करून मतदारांची ‘सवणूक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे अर्जदार वानखेडे यांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपावरून मतभेद होऊन, आघाडी तुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी उपमुक्यमंत्री अजित पवार यांनी आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे दिल्यामुळे सरकार अल्पमतात आल्याने,मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २६ सप्टेंबर रोजी राजीनामा दिला होता. चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने, राज्यपालांनी केंद्र सरकारकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. त्यावर गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होऊन राज्यपालांची शिफारस मंजूर करुन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याकरिता राष्ट्रपतींकडे प्रस्ताव पाठवला होता. २८ सप्टेंबर रोजी या प्रस्तावावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असून त्याशिवाय कोणतेही लोकनियुक्त सरकार अस्तित्वात नाही. परंतु असे असताना, काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करणा-या जाहिरातीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आजही तेच मुख्यमंत्री आहेत, त्यांचेच सरकार कार्यरत आहे असा आभास निर्माण करीत आहे. शेवटी पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अशी स्वाक्षरी करीत असल्याचेही दर्शवले जात आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गैरअर्जदार असा उल्लेख असलेल्या या तक्रारीत, चव्हाण हे जाणीवपूर्वक असे करीत असून स्वतः मुख्यमंत्रिपदी कायम असल्याचा आभास निर्माण करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे विलास वानखेडे यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment