चीन अमेरिकेच्या पुढेच…

combo2
वॉशिंग्टन – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) ताज्या अहवालानुसार, समकक्ष खरेदी क्षमतेच्या आधारावर चीनचे सकल राष्ट्रीय उत्पन्न १७.६ लाख कोटी डॉलर्स इतके वाढले असून याच निकषावर अमेरिकेचे सकल राष्ट्रीय उत्पन्न १७.४ लाख कोटी डॉलर्स इतके आहे. चीनची लोकसंख्या अमेरिकेपेक्षा काही पटीने जास्त असल्याने दरडोई उत्पन्नाचा विचार करता तसेच एकूण श्रीमंतीचा विचार करता अमेरिका चीनपेक्षा पुढे असली तरी तांत्रिकदृष्ट्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या निकषावर मात्र चीनने अमेरिकेला मागे टाकले आहे. त्यामुळे गेली १४५ वर्षे सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारे जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेला आता दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

चीनची अर्थव्यवस्था गेल्या तीन दशकांत दहा टक्क्यांपेक्षा जास्त गतीने वाढल्यामुळे चीनला हे वैभव प्राप्त झाले असून जागतिक मंदीच्या सावटामुळे घसरलेली चीनची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केला असता अद्यापही चीनचे दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न अमेरिकेच्या तुलनेत एक चर्तुथांश इतके आहे. मात्र, अति लोकसंख्येमुळे देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न समकक्ष खरेदी क्षमतेच्या निकषाच्या आधारे अमेरिकेपेक्षा अधिक आहे. चालू आर्थिक वर्षात चीनची अर्थव्यवस्था ७.४ टक्क्यांच्या गतीने तर पुढील वर्षी ७.१ टक्क्यांच्या गतीने वाढणार आहे, असा अंदाज आयएमएफतर्फे वर्तविण्यात आला आहे.

Leave a Comment