आवश्यकता भासली तर धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत नेऊ – बाळासाहेब थोरात

thorat
अहमदनगर – लोकसभा निवडणूकी नंतरच्या काळात कॉंग्रेसची स्थिती चांगली सुधारली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच आघाडी फुटल्याचा फायदा कॉंग्रेसलाच होणार आहे. मात्र तरिदेखील निवडणूकीच्या निकालानंतर आवश्यकता भासली तर धर्म निरपेक्ष पक्षांना सोबत घेतले जाईल असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर येथे केले.

अहमदनगर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेद्वार सत्यजित तांबे यांच्या प्रचारासाठी आलेले बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की, विधानसभा निवडणूकीत अल्पसंख्यांक दलित, मागासवर्गीय, शेतकरी आणि सर्वसामान्य जनता ही कॉंग्रेस पक्षाची खरी ताकद आहे. समाजातील सर्व प्रमुख घटक कॉंग्रेस बरोबरच असल्याने कॉंगेसला कोणतीही अडचण नाही. राष्ट्रवादी बरोबर आघाडी असताना विरोधकांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले त्यांनाच उमेद्वारी दिल्याची टीका थोरात यांनी केली. ते म्हणाले काही नेते व माजी मंत्री यांच्यावरील आरोपांसाठी विरोधकांनी सभागृहाचे कामकाज देखील बंद पाडले होते. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले नसल्याने त्याबाबत काही बोलणे योग्य होणार नाही, असे सांगून थोरात म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाकडे तीन जागा पूर्वीपासूनच आहेत. आताच्या निवडणूकीत कॉंग्रेसच्या जागांमध्ये जिल्ह्यात ही वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment