राज ठाकरेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

raj-thackarey
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूकीच्या प्रचारसभेत प्रांतीय भावना भडकवणारी भाषणे करून राज्यात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राज ठाकरे आणि त्यांच्या सहकार्‍यांना निवडणूकीच्या पुढील प्रक्रियेत भाग घेण्यापासून बंदी करण्यात यावी अशी मागणी करणारी एक याचिका नागपूरचे अ‍ॅड. विनोद तिवारी यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबईचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी तसेच ग्रेटर मुंबईचे निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल केली आहे.

राज ठाकरे यांनी प्रचारादरम्यान जी विविध भाषणे केली आणि त्यातही मुंबईतील भांडूप, घाटकोपर आणि कांदिवली या ठिकाणी झालेल्या सभांमध्ये जी भाषणे केली आणि जी बहुतेक सर्व मराठी वृत्तवाहिन्यांनी थेट प्रसारित केली त्या भाषणांमध्ये हिंदी, बिहारी, भोजपुरी, गुजराथी, कन्नड, तेलगू, तामिळ,मल्ल्याळी इत्यादी भाषा बोलणार्‍या मतदारांसंदर्भात केलेली विधाने घटनेच्या १४ ते ३२ या कलमांन्वये दिलेल्या अधिकारांचे हनन करणारे असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे अशा प्रकारची भाषणे हा भ्रष्टनिवडणूक पद्धती कायद्याचे कलम १२३ (३) आणि १२५ अन्वये गुन्हा ठरतो याकडेही याचिकेत लक्ष वेधले आहे. यामुळे या सर्व अमराठी भाषिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून मराठी भाषिकांमध्ये राज ठाकरेच आपल्यासाठी देवदूत असल्याची भावना निर्माण होवू शकते. अशा प्रकारे निवडणूक प्रचार हा निवडणूक कायद्याचा भंग ठरतो असा दावा अ‍ॅड. विनोद तिवारी यांनी केला आहे. अ‍ॅड. विनोद तिवारी हे नागपुरातील एक विधीव्यावसायिक असून भारतीय जनता पक्षाच्या विधी आणि संसदीय आघाडीचे राष्ट्रीय सहसंयोजकही आहेत. त्यांनी आज ही याचिका दाखल केली असून माध्यमांना त्याच्या प्रती उपलब्ध करून दिल्या. या याचिकेच्या प्रती राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे पाठविण्यात आल्या आहेत.

Leave a Comment