मलालाविरोधात तालिबानचा निषेध

malala
इस्लामाबाद – तालिबानी दहशतवाद्यांच्या विरोधात जाऊन मुलींमध्ये शिक्षणाचा प्रसार करणारी पाकिस्तानातील छोटी समाजसेविका मलाला युसुफझाई हिला शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आज तिच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. एहसानउल्लाह एहसान याने मलालाला देण्यात आलेल्या नोबेल पुरस्काराचा निषेध करत, ती इस्लामचे प्रतिनिधित्व करण्यास असमर्थ असल्याचे म्हटले आहे. इस्लामविरोधी कृत्य करणाऱ्या नागरिकांविरोधात आमची लढाई सुरूच राहणार असल्याचेही एहसानने सांगितले.

स्त्री शिक्षणाचा प्रसार करत असल्यामुळे तालिबानी दहशतवाद्यामंनी मलाला हिच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर तिला उपचारासाठी ब्रिटनमध्ये हलविण्यात आले होते. मृत्यूशी यशस्वी झुंज दिल्यानंतरही तिने स्त्री शिक्षणासाठीची आपली चळवळ सुरूच ठेवली. मलाला आतापर्यंतची सर्वांत तरुण नोबेल विजेती ठरली आहे. मलालाचे वय लहान असूनही तिने अनेक वर्षे स्त्रीशिक्षणासाठी लढा दिला असून, आपल्या कृतीतून सर्वांसमोर आदर्श उभा केला आहे, असे नोबेल समितीने म्हटले आहे.

Leave a Comment