देशात फटाके उडवण्यावर बंदी आणण्यासाठी जनहित याचिका

crackers
नागपूर – भारतामध्ये फटाके उडविण्यावर बंदी आणावी, अशी मागणी करणारी पर्यावरण संरक्षण संदर्भातील जनहित याचिका नागपूरचे सामाजिक पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉ. रविंद्र भुसारी यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पुणे येथे दाखल केली आहे. डॉ. रविंद्र भुसारी मागील वीस वर्षापासून फटाकेविरोधी अभियान चालवित असून त्यांच्या याचिकेवर न्या. अजय देशपांडे आणि न्या. विकास किनगावकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. याचिकेत नमूद केल्यानुसार फटाके उडविण्यासंदर्भातील अनेक विषय नमूद केलेले आहेत. फटाक्यांमधून अनेक प्रकारचे विषारी वायू वातावरणात सोडले जातात आणि मोठा प्रमाणात कागदी विषारी कचरा तयार होतो. फटाक्यांमध्ये असलेल्या ब्लॅक पावडर, कोळसा, सल्फर, पोटॅशियम नायट्रेट इत्यादींचे अत्यंत घातक मिश्रण समाविष्ट असते. त्यामुळे वातावरण प्रचंड प्रमाणात दुषित होते. फटाक्यांमुळे होणारे प्रचंड ध्वनिप्रदूषण, मानवी जीवन आणि पर्यावरणासाठी धोकादायक असल्याचे नमूद करून याविरोधात कायद्याची अंमलबजावणी करणा-या यंत्रणा कोणतेही परिणामकारक पाऊल उचलतांना दिसत नाही, असा आरोप करण्यात आला आहे. जगातील अनेक देशांमध्ये फटाक्यांचा साठा करणे, हाताळणे, वाहतूक करणे, आयात-निर्यात करणे आणि फटाके फोडण्यासंदर्भात अत्यंत कडक नियम आहेत. कॅनडा, चीन, हाँगकाँग, इंडोनेशिया, मलेशिया, नार्वे, फिलीपाईन्स, आयर्लंड, सिंगापूर, स्वीडेन, तायवान, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि अमेरिका खंडातील अनेक देशांमध्ये फटाक्यांसदर्भात कडक कायदे आहेत. तसेच यातील अनेक देशांमध्ये फटाके उडविण्यावर संपूर्ण बंदी आहे, असा संशोधन अहवालही याचिकेसोबत सहयोग ट्रस्टच्या संशोधन कमिटीने दाखल केला आहे.

Leave a Comment