कॉंग्रेसच्या जाहिरातींच्या विरोधात भाजपची तक्रार

combo
मुंबई – मोफत अ‍ॅम्ब्युलन्स सेवा, मोफत ब्लड बँक सेवा या आरोग्यसेवा विषयक सरकारी योजनेचा काँग्रेसने निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी जाहिरातींमधून दुरुपयोग केल्याचा आरोप करीत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपने तक्रार केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, यांचे विरोधात भाजप विधी व विधायकी आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व सहसंयोजक अ‍ॅड. विनोद तिवारी यांनी निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त व्ही.एस. संपत व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांच्याकडे या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. शासकीय यंत्रणेचा व सरकारी तिजोरीतून चालणा-या कल्याणकारी योजनेच्या नावाचा राजकीय हितासाठी वापर केल्या प्रकरणीची ही तक्रार असून फौजदारी कारवाईची मागणी अ‍ॅड. विनोद तिवारी यांनी या निमित्ताने केली आहे. डायल १०८ मोफत अ‍ॅम्ब्युलन्स सेवा व डायल १०४ मोफत ब्लड बँक सेवा ही केवळ काँग्रेसचीच योजना असून त्यासोबत पंजा हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या १०० टक्के निधीतून चालणा-या या योजनेचा खासगी मालमत्ता समजून सामान्यांना प्रलोभन देण्याचा प्रकार केला आहे याकडे अ‍ॅड. विनोद तिवारी यांनी लक्ष वेधले आहे.

Leave a Comment