ऐन रणधुमाळीत सुसंस्कृत आबांनी केले वादग्रस्त वक्तव्य

r-r-patil
सांगली – तासगाव-कवठेमहंकाळ मतदारसंघात निवडणुकीला उभे असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर कवठे-एकंद गावात प्रचाराच्या भाषणादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केले आहे. याच मतदारसंघातील मनसेचे उमेदवार सुधाकर खाडे यांच्यावर बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असून ते तुरुंगात आहेत. त्यामुळे मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी आबांना पाठिंबा दिला होता. त्याबाबतची माहिती देताना आबांचा तोल सुटला.

मनसेच्या उमेदवाराला आमदार व्हायचे होते तर त्याने निवडणुकीपर्यंत बलात्कार करायला नको होता असे आबांनी वक्तव्य केले. दरम्यान, याबाबतची माहिती आबांचे राजकीय विरोधक व सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांना मिळताच त्यांनी आबांच्या भाषणाची क्लिप मिळवली व माध्यमांपर्यंत पोहचवली. त्यानंतर आज दिवसभर याबाबतची व्हिडिओ क्लिप वाहिन्यांवर दाखवली जात आहे. या वक्तव्याबाबत आबांनी स्पष्टीकरण दिले असून, आपण महिलांबाबत वक्तव्य केले नसून, प्रतिस्पर्धी उमेदवारावर उपरोधिक टीका केली आहे. भाषणाच्या ओघात मी प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीका करताना हे बोललो आहे. यातून महिलांचा अपमान करण्याचा माझा कोणताही हेतू नाही. शिवसेनेच्या नेत्या निलम गो-हे यांनी आबांनी हे वक्तव्य प्रतिस्पर्धी उमेदवारावर उपरोधिक टीका केली आहे असे मान्य करीत असल्याने व त्याबाबत खेद व्यक्त केल्याने याचे राजकारण केले जाऊ नये असे म्हटले आहे.

Leave a Comment