आचारसंहितेचा भंग प्रकरणी २१ उमेदवारांवर गुन्हे दाखल

vidhansabha
नागपूर – जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील एकूण २१ उमेदवारांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये सर्वच प्रमुख राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. विना परवानगी मिरवणूक काढणे, सभेच्या वेळी रस्त्यावर अडथळा निर्माण करणे, खासगी भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणे, रात्री उशिरापर्यंत सभा घेणे, निवडणूक निर्णय अधिका-यांची परवानगी न घेता झेंडे व बॅनर सार्वजनिक ठिकाणी लावणे, पक्षाचे चिन्ह असलेले पोस्टर्स व झेंडे विजेच्या खांबावर लावणे, ग्रामपंचायतीच्या इमारतीवर उमेदवाराचे पोस्टर्स लावल्यामुळे हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी दिली.

जिल्ह्यात एकूण १० संवेदनशील मतदान केंद्र आहेत. संपूर्ण १२ विधनसभा मतदारसंघातील मतदान अधिका-यांना व्होटर स्लीपचे वाटप करण्यात आले आहे. या व्होटर स्लीपचे वाटप ११ ऑक्टोबरपर्यंत करण्यात याव्या, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. ११ ऑक्टोबरला शिल्लक असलेल्या व्होटर स्लीम १२ ऑक्टोबरला वाटप करण्यात येणार आहे. १० ऑक्टोबरपर्यंत एकूण १४ लाख ८१ हजार ८१७ व्होटर स्लीपचे वाटप करण्यात आल्याचेही कृष्णा यांनी याप्रसंगी सांगितले. नागपूर शहरात ४ हजार तर ग्रामीणमध्ये ३ हजार ३९६ अधिकारी, कर्मचारी बंदोबस्त सांभाळणार आहे. शहरामध्ये पाच पोलिस आयुक्त, ७ सहाय्यक पोलिस आयुक्त, ४९ पोलिस निरीक्षक, १६७ पोलिस उपनिरीक्षक, २ हजार ९१३ पुरुष तर ६५३ महिला पोलिस कर्मचारी आपले कर्तव्य बजावतील. तर ग्रामीण मध्ये सहा पोलिस उपविभागीय अधिकारी, २६ पोलिस निरीक्षक, १२६ पोलिस उपनिरीक्षक, २ हजार ४०५ पोलिस शिपाई व ८३३ पोलिस हवालदारांचा समावेश राहणार आहे. याशिवाय राज्य राखीव दलाचे जवानही तैनात राहणार आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण २८३८ शस्त्र परवाने असून त्यापैकी ८७४ शस्त्र जमा करण्यात आले असल्याची माहितीही कृष्णा यांनी दिली.

Leave a Comment