गुगलने चालकाविना चालणारी कार तयार केल्यानंतर डेमलरने चालकाविना स्वतःच चालणारा ट्रक तयार केला आहे. हायवेवरही हा ट्रक चालकाच्या मदतीशिवाय अतिशय व्यवस्थितपणे आणि अपघाताशिवाय रस्ता कापू शकणार आहे.
हायवे पायलट सिस्टीमसह चालणारा ट्रक
मर्सिडीज बेंझ फ्यूचर ट्रक २०२५ या नावाने बनविला गेलेला हा ट्रक भविष्यातील वाहतूक आव्हाने आणि संधी लक्षात घेऊन तयार करण्यात आल्याचे डेमलरचे बोर्ड मेंबर वोल्फगाँग बर्नहार्ड यांनी सांगितले. ते म्हणाले या ट्रकमध्ये हायवे पायलट असिस्टंट सिस्टीम ही अत्याधुनिक यंत्रणा बसविली गेली असून विमानातील ऑटो पायलटच्या धर्तीवर ही यंत्रणा काम करते. हा ट्रक ताशी ८५ किमीच्या वेगाने हायवेवर चालकाच्या मदतीशिवाय अंतर कापू शकतो. शिवाय त्यात इंधन बचत आणि कमी प्रदूषण हेही साध्य करता येणार आहे.
या ट्रकमध्ये रडार सेन्सर्स आणि कॅमेरे बसविले गेले आहेत. त्यांच्या मदतीने अपघाताविना ड्रायव्हिंग शकय होणार आहे. या ट्रकसाठी सेंट्रल कंट्रोल स्टेशनची आवश्यकता भासणार नाही. रडार सेन्सर ट्रकच्या पुढील भागात खालच्या बाजूस बसविले गेले आहेत. हे सेन्सर लांबचा व जवळचा रस्ता स्कॅन करतात. विंडस्क्रीनमागे बसविला गेलेला स्टीरिओ कॅमेरा पुढचा मार्ग दाखवितो इतकेच नव्हे तर सिंगल रोड, टू लेन रोड. पादचारी, हलणार्या व स्थिर वस्तू, रस्त्याचा पृष्ठभाग स्पष्टपणे आयडेंटिफाय केला जातो.
या ट्रकचा वेग आपोआपच नियंत्रित होतो. तसेच ट्रकवरील रडारमुळे वाहतूक कंपनीला ट्रकचे लोकेशन, ट्रक जात असलेला मार्ग व नियोजित स्थळी साधारणपणे कधी पहोचू शकेल ती वेळ समजू शकते. हायवे पाललट सिस्टीममुळे ट्रक चालकांवरही वाहन चालविण्याचा जादा ताण येत नाही असाही कंपनीचा दावा आहे.