१६ ऑक्टोबर रोजी इस्त्रोच्या तिस-या दिशादर्शक उपग्रहाचे प्रक्षेपण

isro
बंगळुरू – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) तिस-या दिशादर्शक उपग्रहाचे प्रक्षेपण काही तांत्रिक अडथळ्यांमुळे पुढे ढकलण्यात आले असून, १६ ऑक्टोबर रोजी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी दिशादर्शक उपग्रह ‘आयआरएनएसएस १ सी’ या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार होते. इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजून ३२ मिनिटांनी या उपग्रहाचे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण केले जाणार आहे. ‘पीएसएलव्ही सी २६’ या प्रक्षेपकाच्या सहाय्याने सदर उपग्रह अंतराळात सोडण्यात येणार आहे. अमेरिकेच्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमच्या धर्तीवर विभागीय नेव्हिगेशन प्रणाली विकसित करण्याच्या उद्देशाने इस्त्रो सात दिशादर्शक उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे. त्यापैकी दोन उपग्रहांचे यापूर्वीच प्रक्षेपण करण्यात आले होते. ‘आयआरएनएसएस १ ए’आणि ‘आयआरएनएसएस १ बी’ या उपग्रहांचे यापूर्वीच प्रक्षेपण करण्यात आले आहे.

Leave a Comment