सट्टा बाजारात भाजप-मनसेची चलती

combo4
मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणूकीत सत्ता कोणाची येणार यावर सध्या सट्टा बाजार गरम झाला आहे. भाजप-शिवसेना एकत्र येऊन सत्तेत येतील असे मानले जात असले तरी सट्टोडियांनी मात्र भाजप आणि मनसे एकत्र येऊन सत्तेत येतील यावर एक रुपयाला दीड रुपया असा सट्टा लावला आहे. त्याउलट काही सट्टेबाजांनी मात्र भाजपला विरोधी पक्षात ठेवून राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे सत्तेत येतील यावर एक रुपयाला पावणे दोन रुपये सट्टा लावला आहे. राज्यात सर्वाधिक सट्टा मुंबई, धुळे, नागपूर आणि औरंगाबादमध्ये लावला जात असून राज्याबाहेरील शहरांमध्ये ही सट्टोडिये बोली लावत आहेत.

सट्टा बाजाराच्या खबर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपला ९० ते ११० जागा मिळतील यावर एक रुपयाला सव्वा रुपया, १२० जागा मिळतील यावर एक रुपयावर दीड रुपया आणि १४० जागा मिळतील यावर एक रुपयावर दोन रुपये असा सट्टा लावला जात आहे. मुंबई आणि शहरी भागात तसेच विदर्भात भाजपला भरघोस मतदान होईल असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे. त्याचवेळी शिवसेनेला ९० जागा मिळतील यावर एक रुपयावर दोन रुपये आणि ६० पर्यंत जागा मिळतील यावर एक रुपयावर सव्वा रुपया असा सट्टा लावला जात आहे. सट्टेबाजीच्या नियमानुसार ज्यावर कमी पैसे लागतात त्याचा अंदाज जास्त बरोबर असतो. त्यानुसार कॉंग्रेसला ४० ते ५० जागा मिळतील या अंदाजावर एक रुपयाला सव्वा रुपया आणि ६० जागा मिळतील या अंदाजावर एक रुपयाला दोन रुपये सट्टा लावला जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला ६० जागांसाठी एक रुपयाला दीड रुपया आणि ८० जागांसाठी एक रुपयाला दोन रुपये असा सट्टा लावला जात आहे. मनसेला १५ ते २० जागा मिळतील यावर एक रुपयाला दीड रुपया आणि ३० जागा मिळतील यावर दोन रुपये लावले जात आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हारतील यावर देखील सव्वा रुपयाचा सट्टा लागला आहे.

Leave a Comment