भारत-वेस्टइंडिज एकदिवसीय क्रिकेट मालिकेवर संकट कायम

cricket1
किंग्सटन – कैरेबियन क्रिकेट खेळाडूंची मागणी नाकारत वेस्टइंडिज प्लेयर्स असोसिएशन (वीपी) चे अध्यक्ष वॉवेल हाइंड्सने आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. याआधी वेस्टइंडिजच्या खेळाडूंनी वेतन आणि कराराच्या रकमेबाबत झालेल्या विवादात हाइंड्स यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि एकदिवसीय मालिकेचा बहिष्कार घालण्याची देखील धमकी दिली होती. बीसीसीआयने भारताविरूद्धची मालिका खेळण्यासाठी कैरेबियन संघाची समजूत घातली होती. मात्र, आता पुन्हा एकदा भारत-वेस्टइंडिज मालिका पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

दरम्यान, वेस्टइंडिज संघाच्या खेळाडूंनी ब्रावोच्या नेतृत्वात हाइंड्स यांना पत्र लिहून आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली होती. ब्रावोने लिहिले होते की, हाइंड्स यांनी खेळाडूंचा विश्वास गमाविला आहे. कारण, त्यांनी वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डासोबत करार केला, ज्यात त्यांनी खेळाडूंच्या वेतनात कपात करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर हाइंड्स यांनी पत्राच्या उत्तरात ब्रावोला कडव्या शब्दात म्हटले होते की, ‘वीपा’ च्या कायद्यात अधिका-यांना हटविण्यासाठी किंवा निवडीसाठी एक प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे ब्रावोच्या मागणीला मान्य करणे अशक्य आहे. ब्रावो आणि संघातील खेळाडूंनी याआधी धमकी दिली होती की, जर त्यांची मागणी मान्य करण्यात नाही आली तर, ते भारताविरूद्धच्या पहिल्या सामन्यात खेळणार नाही. परंतु अखेरच्या क्षणी बीसीसीआयने हस्तक्षेप करून या प्रकरणाला कसबसे सांभाळले आणि सामना होणे शक्य झाले.

वेस्टइंडिजला भारत दौ-यावर ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका, एक टी-२० सामना आणि कसोटी मालिका खेळायची आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर दौरा पूर्ण करण्यासाठी बीसीसीआयने कैरेबियन खेळाडूंची समजूत घातली होती. मात्र, हाइंड्स यांनी पदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्याने सध्या कैरेबियन खेळाडू नाराज आहेत. त्यामुळे नाराज असलेला वेस्टइंडिजचा संघ भारताविरूद्धची मालिका खेळणार की नाही? याचे संकट अद्यापही कायम आहे.

Leave a Comment