पावसाअभावी धान उत्पादक संकटात

farmer
गोंदिया – गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने धान उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. एक पाण्यासाठी पीक धोक्यात आल्याने शेतकरी सिंचनाच्या पाण्यासाठी चांगलीच धावपळ करीत आहे. पाण्याच्या वादात शेतकरी एकमेकांचे वैरी होऊ लागले आहेत. उल्लेखनीय असे की, गोंदिया जिल्ह्यात जवळपास १ लाख सिंचन क्षमता असलेले प्रकल्प व तलाव आहेत. तरीही शेतकर्‍यांना सिंचनाच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अलीकडे निवडणुकीची धामधूमसुरु असल्याने अधिकारी वर्गही याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शेतकरी चांगलाच हतबल झाल्याचे दिसून येत आहे.गोंदिया जिल्हा धानपिकाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. खरीब हंगामात १ लाख ९० हजार हेक्टर जमिनीखालील धानपिकाची लागवड करण्यात आली. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच शेतकर्‍यांना वरुणदेवाने चांगलेच अडचणीत आणले. सुरुवातीला पाऊस लांबणीवर गेल्यामुळे रोवणीचे काम लांबले होते. परंतु, मध्यंतरी दमदार पाऊस पडल्यामुळे लगबगीने जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी रोवणीचे काम आटोपले. थोडीफार आशाही पल्लवीत झाली. मात्र,मागील महिन्याभरापासून वरुणदेवाने पुन्हा वक्रदृष्टी दाखविल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. अल्पमुदतीचे धान लोमांवर आले आहेत. तर दीर्घ मुदतीचे धानपिक गर्भात आहे. दीर्घ मुदतीच्या धानाला सिंचनाची आवश्यकता आहे. परंतु, पावसाने दडी मारल्याने शेतकरी चांगलाच संकटात आला आहे. धानपिक वाचविण्यासाठी शेतकरी सिंचनाच्या पाण्यासाठी धावपळ करत आहेत. त्यातच पाण्यासाठी शेतकरी एकमेकांचे डोके फोडत आहेत. गोंदिया जिल्ह्यात सिंचन क्षमतेचे प्रकल्प व तलाव असूनही अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. निवडणुकीची धामधूम सुरु असताना अधिकारी वर्गही निवडणुकीच्या कामाला लागले आहे.

Leave a Comment