
पुणे – लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन परराष्ट्र मंत्र्यांने पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानाला बिर्याणी खाऊ घातली होती, त्यावरून नरेंद्र मोदी यांनी टीकेचे रान पेटविले होते. आता तेच मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांना तीन दिवस पाहुणचार देतात. एकीकडे सीमेवर पाकिस्तानी सैनिक निष्पाप नागरिकांवर गोळीबार करत असताना साडी आणि शॉलच्या डिप्लोमसी करत असून, पंतप्रधान येथे मत मागण्यासाठी गल्लोगल्ली फिरत असल्याची बोचरी टीका कॉंग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुलाब नबी आझाद यांनी केली. विधानसभा लढविणाऱ्या कॉंग्रेसच्या शहरातील उमेदवारांच्या प्रचारासाठी गुलाम नबी आझाद यांच्या रोड शोचे शहरात आयोजन करण्यात आले होते.
न केलेल्या कामाचे भाजपने केले मार्केटींग- गुलाब नबी आझादांची टिका
आझाद म्हणाले, कॉंग्रेस सरकारने भरपूर विकास प्रकल्प उभारले आहेत, सर्वसामान्यांसाठी योजना आणल्या आहेत. परंतू पैशाअभावी आम्ही मार्केटींगमध्ये कमी पडलो. परंतू भाजपने काहीच केले नाही. कायम विरोधी बाकावर असलेल्या भाजपने मार्केटींगवर भरपूर पैसा खर्च केला. हा पैसा कोठून आला, हा तसा प्रश्नच आहे. त्यामुळे भाजप हा कामासाठी नव्हे तर न केलेल्या कामांचे मार्केटींग करणारा आणि मोदी यांच्या हुकूमशाही नेतृत्वाचा पक्ष असल्याची टीका आझाद यांनी यावेळी केली.
