नवाज शरीफ यांनी बोलावली राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक

nawaz
इस्लामाबाद – पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर उद्भवलेल्या तणावजन्य परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी उच्चपदस्थ लष्करी आणि अन्य नेत्यांची बैठक बोलावली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, बैठकीत भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर उद्भवलेल्या तणावाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत शरीफ यांच्यासह संरक्षण, गृह, अर्थ, सूचना मंत्री तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे संयुक्त प्रमुख, तिन्ही दलांचे प्रमुख आणि अन्य वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. एक ऑक्टोबरपासून भारत पाकिस्तान सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू काश्मिरमधील रहिवासी परिसरात केलेल्या गोळीबारात आठ नागरिक मारले गेले आहेत. तर अन्य ८० जण जखमी झाले आहेत. भारताकडून करण्यात आलेल्या गोळीबारात १२ पाकिस्तानी नागरिक मारले गेल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. याबाबत पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान आणि पाकिस्तानी मुस्लिम लीग (क्यू)चे परवेझ इलाही यांनी पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांना लक्ष्य केले आहे.

Leave a Comment