देवेंद्र फडणवीस यांची चेतन भगतशी चर्चा

chetan-bhagat
मुंबई – भाजपा प्रदेशाध्यक्ष व युवा नेते देवेंद्र फडणवीस व यूथ आयकॉन प्रख्यात लेखक चेतन भगत शनिवारी मुंबई येथे ‘भारताचे भवितव्य तरुणांच्या हाती’ या विषयावर जाहीर चर्चा करणार असून राज्यभरातील लाखो तरुण यू ट्यूबच्या माध्यमातूनचर्चेच्या अनोख्या उपक्रमात सहभागी होणार आहेत. सिंधी सोसायटीच्या व्ही. ई. एस. डिग्री कॉलेजमध्ये शनिवारी सकाळी अकरा ते एक या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित तरुण-तरुणी चर्चेमध्ये सहभागी होऊ शकतात. सहभागासाठीचे रजिस्ट्रेशन मोफत असून त्यासाठी ९०२१५१५०१५ या क्रमांकावर मिस कॉल देणे गरजेचे आहे. हा चर्चेचा कार्यक्रम यू ट्यूबवरून www.youtube.com/DevendraFadnavis या लिंकवर लाईव्ह दाखविण्यात येईल.

राज्यात ठिकठिकाणी मोठ्या स्क्रीनवर हा कार्यक्रम दाखविण्यात येईल व त्याद्वारे राज्यभरातील लाखो तरुणांना त्याचा लाभ होईल. विवेकानंद एज्युकेशन सोसायटीने सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात भाजपाच्या प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी. मतदानाचे महत्त्व या विषयावर बोलणार आहेत. महाराष्ट्र हे तरुणांचे राज्य आहे. राज्याचे सरासरी वय २७ वर्षे आहे. एकूण लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या २६ पेक्षा कमी वयाची आहे. उद्याची तरुणाई ठरणाऱ्या सात ते चौदा वयोगटातील बालकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या पंधरा टक्के आहे. अशा स्थितीत या युवावर्गाला काय हवे हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. राज्याच्या जडणघडणीत युवकांच्या आशा-आकांक्षांना कसे स्थान मिळेल हे पाहणे महत्त्वाचे आहे. युवावर्गाच्या हाती राज्याचे भवितव्य कसे घडावे याचाही विचार करणे आवश्यक आहे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस व चेतन भगत यांची चर्चा रंजक ठरेल. सामाजिक कार्याचा अनुभव व राज्यातील भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करताना झालेल्या नव्या जाणीवा याच्या आधारावर देवेंद्र फडणवीस यांनी युवा वर्ग केंद्रबिंदू मानून एक व्हिजन तयार केली आहे. सध्याच्या काळात चेतन भगत हे केवळ लेखक नव्हे तर नव्या पिढीचे विचारविश्व समर्थपणे मांडणारे भाष्यकार ठरले आहेत. त्यामुळे या दोघांचा संवाद ऐकायला युवावर्ग उत्सुक आहे.

Leave a Comment