जबॉन्गला विकत घेणार ॲमेझॉन

amazon
नवी दिल्ली – ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ॲमेझॉनतर्फे भारतातील ऑनलाइन रिटेल कंपनी असलेली जबॉन्ग खरेदी करण्यासाठी प्रारंभिक स्तरावरील चर्चा सुरु करण्यात आली आहे. अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी असलेली ॲमेझॉन भारतात फॅशन उत्पादनांच्या विक्रीतील हिस्सेदारी वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. जबॉन्गच्या खरेदीने ॲमेझॉनचा हा हेतू साध्य होऊ शकणार आहे, अशी माहिती या दोन्ही कंपन्यांच्या व्यवहाराबाबत माहितगार सूत्रांकडून देण्यात आली आहे. फ्लिपकार्टने मिंट्राची खरेदी केल्यानंतर जबॉन्ग हा ॲमेझ़ॉनसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो, असे देखील या सूत्रांनी सांगितले.

या सूत्रांनी पुढे सांगितले की, जबॉन्ग ही त्या फॅशन पोर्टल्सपैकी एक कंपनी आहे ज्याची खरेदी करण्यास ॲमेझॉन उत्सुक आहे. असे असले तरी, जबॉन्गची खरेदी करण्यासाठी अन्य कंपन्यांनी देखील रस दाखविला आहे. ॲमेझॉन आणि जबॉन्ग या दोन्ही कंपन्यांमध्ये प्रारंभिक स्तरावरील चर्चा सुरु आहे. जबॉन्गचे बाजारमूल्य ३००० कोटी रुपये किंवा ५० कोटी डॉलर्स इतके आहे. या व्यवहारासाठी जबॉन्गतर्फे कमीत कमी ७० कोटी डॉलर्सची मागणी केली आहे, असे देखील या सूत्रांनी सांगितले. याबाबतीत ॲमेझॉनकडे विचारणा केली असता कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, आम्ही भविष्यात काय करणार आहोत, यावर कंपनीतर्फे कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. याशिवाय अन्य काही बाबींवर प्रतिक्रिया देण्यास देखील या अधिकार्‍यांनी असमर्थता दर्शविली. सूत्रांनी पुढे सांगितले की, ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनी नुकतीच भारतात दोन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

Leave a Comment