पुढील वर्षी पाकिस्तान आणि इंग्लंड दुबईमध्ये आमने-सामने

cricket
कराची – पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन संघांदरम्यान पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यात दुबईमध्ये क्रिकेट मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. दुबई येथे खेळविण्यात येणार्‍या या मालिकेचे यजमानपद पाकिस्तान भूषविणार असून यावेळी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविण्यात येणार असल्याची माहिती दोन्ही क्रिकेट मंडळांकडून देण्यात आली.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या अधिकार्‍याने या मालिकेसंदर्भात माहिती देताना सांगितले की, पुढील वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात इंग्लंड विरुद्ध आम्ही तीन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहोत. याशिवाय एक टी-२० सामना देखील आयोजित करण्यात आला आहे. या मालिकेचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट मंडळ भूषविणार आहे, असे या अधिकार्‍याने सांगितले. श्रीलंका संघावर २००९ साली लाहोर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकाही आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन करण्यात आलेले नाही. दोन वर्षांपूर्वी इंग्लंडने पाकिस्तानच्या भूमीत खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर दुबई येथेच खेळविण्यात आलेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला असला तरी एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेत मात्र त्यांनी विजय मिळवला होता. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेनंतर लगेचच दुबईमध्येच भारताविरुद्ध मालिका आयोजित करण्यास पाकिस्तान क्रिकेट मंडळ उत्सुक आहे. याबाबत बोलताना पीसीबीच्या अधिकार्‍याने सांगितले की, इंग्लंडविरुद्धची मालिका निश्चित झाली असली तरी भारताविरुद्धच्या मालिकेला अजूनही प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. असे असले तरी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या भविष्यातील दौर्‍यांमध्ये या मालिकेचा समावेश करण्यात आलेला आहे. या दोन्ही देशांविरुद्धच्या मालिकांमुळे आम्हाला मंडळाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास हातभार लागू शकतो, असे देखील या अधिकार्‍याने सांगितले.

Leave a Comment