यंदाच्या दिवाळीत ऑनलाइन कंपन्या रचणार नवा इतिहास

online
नवी दिल्ली – यंदाच्या वर्षी दिवाळीसाठी ऑनलाइन विक्री संकेतस्थळांकडून ग्राहकांसाठी विविध योजना जाहीर केल्या जात आहेत. या आकर्षक योजनांमुळे ग्राहकांची पसंती ऑनलाइन खरेदीला मिळत असून यंदाच्या वर्षी या संकेतस्थळांकडून केल्या जाणार्‍या खरेदीमध्ये ३५० टक्क्यांपर्यंतची वाढ होऊ शकते असा अंदाज असोचेमतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. भारतातील व्यापार संघटनांची शिखर संस्था असलेल्या असोचेमतर्फे नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, ऑनलाइन खरेदीच्या वाढणार्‍या प्रमाणामुळे मॉलमध्ये जाऊन खरेदी करणार्‍यांच्या संख्येत ५० ते ५५ टक्क्यांची घट होऊ शकते. यंदाच्या दिवाळी १०,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची खरेदी ऑनलाइन संकेतस्थळांमार्फत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत देशातील ऑनलाइन विक्री संकेतस्थळे नवा विक्रम प्रस्थापित करू शकतात.

या सर्वेक्षणानुसार, भारतात सध्या ऑनलाइन विक्री संकेतस्थळांची उलाढाल ही १२,००० कोटी रुपयांची असून आगामी तीन ते चार वर्षांत ही उलाढाल एक लाख कोटी रुपयांचा पल्ला गाठू शकेल, असा अंदाज आहे. एसोचेमचे महासचिव डी एस रावत यांनी हा अहवाल प्रसिद्ध करताना सांगितले की, ई-कॉमर्सच्या माध्यमातून खरेदी केल्यास लोकांना बिलाचे पैसे देण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध असतात. त्यामुळे सणासुदीच्या हंगामात ऑनलाइन खरेदीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाच पट जास्त वाढ पाहायला मिळू शकते. अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे कपडे, शृंगाराचे सामान, दागिने, भेटवस्तू, पादत्राणे अशा अनेक वस्तू ऑनलाइन विक्री संकेतस्थळांवरून खरेदी केल्या जाऊ शकतात आणि दोन ते तीन दिवसांत त्या वस्तू ग्राहकांना घरपोच मिळतात. त्यामुळे ग्राहक ऑनलाइन खरेदीला पसंती देत आहेत, असे देखील ते म्हणाले. असोचेमने केलेल्या सर्वेक्षणानुसार, यावर्षीच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ई-कॉमर्स संकेतस्थळांवरील विक्री मागील वर्षीच्या तुलनेत २०० टक्क्यांनी वाढली आहे. तसेच या कालावधीत मोबाइलच्या विक्रीत देखील १०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑनलाइन विक्री संकेतस्थळांमुळे मॉल मधील खरेदीवर प्रतिकूल परिणाम पाहायला मिळत आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई यांशिवाय देशातील अन्य काही प्रमुख शहरांमधील मॉलमधील ग्राहकांची संख्या कमी होत आहे. सध्या देशात बांधण्यात आलेल्या मॉलमधील ८० ते ८५ टक्के दुकानांची विक्री झालेली नाही, अशी माहिती देखील या अहवालात देण्यात आली आहे.

Leave a Comment