बारामतीचा शेतकरी अद्याप गुलामगिरीत – मोदी

modi1
बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांच्या बालेकिल्ला असलेल्या बारामतीतच काका-पुतण्यांवर हल्लाबोल केला असून बारामतीतील जनता गुलामगिरीत आहे. पवार स्वतःला लोकप्रतिनिधी मानत नाहीत तर हे स्वतःला राजे-महाराजे समजतात. राष्ट्रवादीने धनगर समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप केला. आज बारामती विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवाराच्या प्रचारसभेत मोदी बोलत होते.

सर्वसामान्यांसाठी, कष्टक-यांसाठी, शेतकरी, शेतमजूरासाठी भाजपचे सरकार आहे. सरकारच्या १०० दिवसांच्या कारभाराचा हिशोब जनतेला देण्यासाठी मी बांधील असून काँग्रेसने त्यांच्या ६० वर्षांच्या कार्याचा हिशोब आधी द्यावा आणि मग माझ्याकडे हिशोब मागावा. गेल्या ६० वर्षांत काँग्रेसने वचने पाळली नाहीत. आज सीमा रेषेवर चाललेल्या गोळीबाराचा उल्लेख होत आहे. मात्र, पवार संरक्षण मंत्री असताना देशाच्या सीमेवर ते किती वेळा गेले ? तसेच राज्यात गृहखाते आपल्याकडे असताना मुंबईवर दहशतवादी हल्ला कसा झाला ? मालेगावसारखे प्रकरण, दलितांवर अत्याचार का होत आहेत, असे प्रश्नही मोदी यांनी उपस्थित केले.

सीमा रेषेवरील हल्ल्याचा विषय राजकीय व्यासपीठावर नको. दहशतवादाचे राजकारण करून जवानांना निराश करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. पाककडून होत असलेल्या हल्ल्याला भारतीय लष्कर चोख प्रत्यूत्तर देत असून, या मुद्दय़ावर पुढाऱयांनी बोलू नये. जवानांची बोटंच रायफलीच्या ट्रिगरमार्फत बोलतील, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

विकासाशिवाय समस्याचे समाधान नाही आणि भाजपा ही विकासाभिमुख राजकारण करते, असे सांगताना मोदी यांनी १५ वर्षांची पापे धुऊन काढण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन मोदी यांनी केले.