आता लवकरच डीटीएच पोर्टेबिलिटी सेवा

dth
नवी दिल्ली – मोबाइलचा दहा अंकी क्रमांक कायम ठेवून आवडेल तो सेवा पुरवठादार बदलण्याची मुभा असणार्‍या मोबाइल पोर्टेबिलिटीच्या धर्तीवर आता लवकरच डीटीएच पोर्टेबिलिटी सेवा देखील सुरु होणार आहे. त्यामुळे अनावश्यक वाहिन्या दाखवून पैसे उकळणार्‍या डीटीएच सेवा पुरवठादाराच्या मनमानीला कंटाळलेल्या ग्राहकांना लवकरच ‘अच्छे दिन…’ येणार आहेत. माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या सेवेविषयी सूतोवाच केले आहेत. ते म्हणाले की, माझे मंत्रालय सध्या या नवीन सेवेवर विचारविनिमय करत आहे. नजीकच्या काळात डीटीएच ग्राहकांना सेट टॉप बॉक्स कायम ठेवून पाहिजे त्या पुरवठादाराकडून दर्जेदार आणि किफायतशीर सेवा मिळवणे शक्य होणार आहे. सेवा पुरवठादार बदलण्यासाठी सेट टॉप बॉक्स न बदलता केवळ कार्ड बदलून या सेवेचा आनंद घेता येईल, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, किफायतशीर दरात चांगली आणि उच्च दर्जाची सेवा प्राप्त करणे हा प्रत्येक ग्राहकाचा अधिकारी आहे. त्यासाठी योग्य ती प्रक्रिया राबविण्याचा केंद्र सरकार विचार करत असून डीटीएल पोर्टेबिलिटी सेवा लवकरच कार्यान्वित केली जाईल, असे देखील त्यांनी सांगितले. केबल डिजिटायझेशनचा तिसरा टप्पा २०१५ च्या अखेरीस, तर चौथा टप्पा २०१६ च्या अखेरीस संपणार आहे. केबल सेवेच्या डिजिटायझेशनची प्रक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी डिजिटल इंडिया मोहिमेचाच एक भाग असून त्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment