चंद्रपूर जिल्ह्यात कॉंग्रेस-भाजपा संघर्ष

combo1
चंद्रपूर जिल्ह्यात सहा मतदारसंघ आहेत. त्यातील चंद्रपूर हा मतदारसंघ राखीव आहे, त्याशिवाय राजुरा, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर आणि वरोडा हे पाच मतदारसंघ खुले आहेत. २००९ साली या जिल्ह्यातील तीन जागा भाजपाने आणि तीन जागा कॉंग्रेसने जिंकल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे हंसराज अहिर निवडून आले होते. या निवडणुकीत सहाही मतदारसंघात भाजपाला मताधिक्क्य प्राप्त झालेले आहे. त्यामुळे भाजपाच्या आशा बुलंद झाल्या आहेत. या विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्याच्या सगळ्या जिंकू अशी त्यांची मनिषा आहे. लोकसभेच्या निवडणुकीतील प्रवाह विचारात घेता ते शक्यही झाले असते, परंतु भारतीय जनता पार्टीतील मतभेदांमुळे आणि पक्षांतर करून बाहेरून आलेल्या उमेदवारांमुळे भारतीय जनता पार्टीच्या वर्चस्वाला ग्रहण लागणार आहे.

चंद्रपूर राखीव हा मतदारसंघ २००९ साली भारतीय जनता पार्टीच्या नानाजी शामकुले यांनी जिंकला होता. यावेळी भारतीय जनता पार्टीने पुन्हा त्यांनाच मैदानात उतरवले आहे. परंतु किशोर जोरगेवार यांनी भाजपाचा त्याग करून शिवसेनेतून उमेदवारी जाहीर केली आहे आणि त्यांची ही उमेदवारी भाजपासाठी डोकेदुखीची ठरली आहे. किशोर जोरगेवार हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक समजले जातात आणि त्यांनीच बंडखोरी केल्यामुळे तो भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे. एकंदरीत भाजपाच्या आशा कितीही बुलंद असल्या तरी पक्षातल्या बंडखोरीचा उपद्रव तिथल्या उमेदवाराला होणार हे नक्की आहे.

या जिल्ह्यातला दुसरा महत्वाचा मतदारसंघ म्हणजे बल्लारपूर. हा सुधीर मुनगंटीवार यांचाच मतदारसंघ आहे. अर्थात ते भाजपाचे ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. तूर्तास तरी मुनगंटीवार यांच्यासमोर मोठे आव्हान उभे नाही, मात्र वरोरा मतदारसंघात आयात उमेदवारामुळे प्रचंड नाराजी आहे. या मतदारसंघात २००९ साली कॉंग्रेसचे आमदार म्हणून निवडून आलेले संजय देवतळे भाजपामध्ये आलेले आहेत. संजय देवतळे हे लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार होते. परंतु भाजपाने त्यांनाच आयात करून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपाच्या कार्यकर्त्यांंमध्ये मोठी नाराजी पसरली आहे आणि ही नाराजी भाजपाला भोवण्याची शक्यता आहे. अर्थात या मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार म्हणून देवतळे निवडून आले नाहीत तरी भाजपाचे नुकसान होणार नाही. कारण नाही तरी ही जागा आता कॉंग्रेसकडेच आहे. परंतु संजय देवतळे यांचा स्वत:चा प्रभाव आणि भाजपाची संघटनात्मक शक्ती यांच्या जोरावर हा मतदारसंघ भाजपाला जिंकता येईल असा विश्‍वास भाजपा नेत्यांना वाटत आहे.

चिमूर हा या जिल्ह्यातला कॉंग्रेसने जिंकलेला आणखी एक मतदारसंघ. या मतदारसंघात कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार हे निवडून आले होते. विजय वडेट्टीवार हे पूर्वी शिवसेनेत होते. २००४ साली ते शिवसेनेचे आमदार म्हणून चिमूरमधून निवडून आले होते. परंतु २००५ साली नारायण राणे शिवसेनेचा त्याग करून कॉंग्रेसमध्ये आले, त्यासोबत वडेट्टीवार सुद्धा कॉंग्रेसमध्ये गेले आणि २००९ साली निवडून आले. यावेळीही त्यांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु त्यांना कॉंग्रेसने ब्रह्मपुरीमध्ये शिफ्ट केले आणि ते आता तिकडे जाऊन उभे आहेत. पण चिमूर मतदारसंघात त्यांच्याऐवजी कॉंग्रेसने अविनाश वरजूकर यांना उभे केले. भाजपाने तिथे बंटी भांगडिया यांना उमेदवारी दिलेली आहे. हे दोन्ही उमेदवार नवखे आहेत, मात्र चिमूर मतदारसंघात अन्य कोणी उमेदवार प्रभावशाली नसल्यामुळे या दोघातच लढत होण्याची शक्यता आहे.

ब्रह्मपुरीमध्ये विजय वडेट्टीवार यांना भाजपाचे विद्यमान आमदार अतुल देविदास देशकर यांच्याशी संघर्ष करावा लागणार आहे. अतुल देशकर हे यापूर्वी तीनदा निवडून आलेले आहेत. या मतदारसंघात देशकर यांचा प्रभाव आहे, परंतु त्यांच्या निवडणुकीस कॉंग्रेसमधले मतभेद नेहमी कारणीभूत ठरले आहेत. याही वेळी या मतभेदाचे फायदे त्यांना मिळणार आहेत. गेल्या निवडणुकीत देशकर यांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला, कारण संदिप गड्डमवार हे कॉंग्रेस नेते बंडखोरी करून उभे होते. त्यांच्यामुळे कॉंग्रेसच्या मतांचे विभाजन झाले आणि त्याचा फायदा देशकर यांना मिळाला. तेच गड्डमवार आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून उभे आहेत. त्याचा फायदा देशकर यांना पुन्हा होणार आहे, परंतु यावेळी त्यांच्या समोर वडेट्टीवार यांच्यासारखा मातबर उमेदवार उभा असल्यामुळे त्यांची निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नाही. विजय वडेट्टीवार हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री होते हे विसरता येत नाही.

कॉंग्रेसने जिंकलेला या जिल्ह्यातला मतदारसंघ म्हणजे राजुरा. या मतदारसंघात कॉंग्रेसचे सुभाष धोटे विजयी झाले होते. यावेळी कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून पुन्हा तेच उभे आहेत. त्यांचा सामना भाजपाच्या संजय धोटे यांच्याशी आहे. त्यांचा या मतदारसंघात फारसा प्रभाव नाही, त्यामुळे कॉंग्रेसचे सुभाष धोटे यांचा राष्ट्रवादीचे सुदर्शन निमकर यांच्याशी सामना होणार आहे.

Leave a Comment