व्हीजेटीआय करणार कल्याण-डोंबिवली रस्त्यांचा दर्जा तपासण्याचे काम

road
कल्याण – कल्याण डोंबिवली शहरात बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांबाबत स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत आयुक्तांनी हा तपास व्हीजेटीआयकडे सोपविला आहे. व्हीजेटीआयकडून या रस्त्यांच्या कामाचा दर्जा तपासला जाणार असून, या संस्थेच्या अहवालाची कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला प्रतिक्षा आहे.

शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून महत्वाच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण केले जात असून, गेल्या २ वर्षांपासून नागरिकांना या रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र सुस्थितीतील रस्ते मिळण्याच्या आशेने हा त्रास नागरिक मुकाट्याने सहन करत आहेत. या रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. यामुळे या रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच या रस्त्याला तडे गेल्याच्या तक्रारी पालिका आयुक्तांकडे नागरिकांनी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पालिका आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी शहरातील या रस्त्याची पाहणी केली होती. या पाहणीत अनेक रस्त्यांना तडे गेल्याचे आढळल्याने आयुक्तांनी या रस्त्याच्या कामाचे ऑडीट करण्याचे आदेश दिले असून, व्हीजेटीआय या कामाचे ऑडीट करणार आहे. संस्थेचा अहवाल आल्यानंतर संबधित ठेकेदारावर कोणती कारवाई करायची याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. केडीएमसी प्रशासनाची या अहवालाकडे नजर लागली असून, या कारवाईमुळे ठेकेदाराचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Comment