
नागपूर – गेली १५ वर्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार महाराष्ट्रात होते. या काळात सत्ताधार्यांनी या राज्याच्या दोन पिढ्या बरबाद केल्या. पहिल्या क्रमांकावरचे राज्य सहाव्या क्रमांकावर नेवून ठेवले. जो महाराष्ट्र या देशाचे आर्थिक नेतृत्व करीत होता त्याला कर्जाच्या गर्तेत लोटले. यामुळे देशाचेही फार मोठे नुकसान झाले. ही परिस्थिती आम्हाला बदलायची आहे. महाराष्ट्राकडे पुन्हा एकदा देशाची आर्थिक सूत्रे सोपवायची आहेत. महाराष्ट्र सुधारला तर देश सुधारेल. आम्हाला देश सुधारायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला महाराष्ट्र सुधारायचा आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्राची ‘स्कॅम महाराष्ट्र’ अशीओळख निर्माण केली. आम्हाला ती बदलून आता ‘स्कील महाराष्ट्र’ अशी ओळख करायची आहे. हे सर्व करण्यासाठी जनतेने मतदान करून भाजपला पूर्ण बहुमत द्यावे आणि महाराष्ट्रात भाजपचे स्थिर सरकार आणावे असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
महाराष्ट्राकडे सोपवायची आहेत देशाची आर्थिक सूत्रे : नरेंद्र मोदी
भारतीय जनता पक्षाच्या नागपूर जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी स्थानिक कस्तूरचंदपार्क मैदानावर एका विशाल सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. यावेळी केंद्रीय ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रुडी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, खा. अजय संचेती, माजी खा. बनवारीलाल पुरोहित आणि दत्ता मेघे प्रभुती यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या सुमारे ४० मिनिटांच्या घणाघाती भाषणात मोदी म्हणाले की, आम्हाला महाराष्ट्राचे चित्र आज बदलायचे आहे. त्यासाठी येणारी निवडणूक अत्यंत महत्वपूर्ण आहेत. ही निवडणूक म्हणजे राजकारणाचा खेळ नाही, कोण आमदार निवडून द्यायचा त्यासाठी ही निवडणूक नाही तर तुमच्या मुलांचे उद्याचे भविष्य काय याचा निर्णय करणारी ही निवडणूक ठरणार आहे. इथल्या तरुणाईच्या हातांना नवे तंत्रज्ञान शिकवायचे आहे आणि स्किल महाराष्ट्र आम्हाला घडवायचा आहे. या राज्याला आता आम्ही माघारू देणार नाही, या राज्याचे भाग्य बदलू आणि देशाच्या विकासात महाराष्ट्राला भागीदार बनवू असे मोदी यांनी ठणकावले. आम्ही राजकीय अस्पृश्यता पाळत नाही, विकासात आम्ही राजकारणही आणत नाही, आम्हाला सोबत चालणारे सरकार हवे आहे असे सांगून राज्यात नुसते सरकार असले तर एक अधिक एक दोन होतात. मात्र आम्हाला एक अधिक एक ११ करायचे आहेत असा दावा मोदी यांनी यावेळी केला, त्यामुळे राज्याचा वेग वाढेल असे सांगतानाच देशात केंद्र आणि राज्य हे टीम इंडियाच्या स्वरूपात मला चालवण्याची अपेक्षा आहे त्यासाठी तुम्ही सहकार्य द्या अशी विनंती मोदी यांनी यावेळी केली. स्वच्छ भारत अभियानाच्या पुढे स्वच्छ शाळा आणि स्वच्छ विद्यार्थी अभियानाचेही मोदी यांनी आज सुतोवाच केले. १४ नोव्हेंबर ही पंडित नेहरूंची जयंती आहे तर १९ नोव्हेंबर ही इंदिरा गांधींची जयंती आहे. १४ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या काळात आम्ही प्रत्येक शाळेत जावून विद्यार्थ्यांना स्वच्छता शिकवू अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. देशातील प्रत्येक व्यक्तीला स्वत:चे घर आवश्यक आहे असे सांगून स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनापर्यंत देशातील प्रत्येक व्यक्तीला स्वत:चे घर मिळेल. तिथे वीज, पाणी, शौचालय या सर्व सोयी असतील यासाठी जनतेने मला आशीर्वाद द्यावे असे आवाहन मोदींनी यावेळी केले. २०२२ मध्ये स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण होत आहेत त्यावेळेपर्यंत माझे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. राजकीय पंडितांनी आता अंदाज बांधण्याची आपली पद्धत बदलावी असा हितोपदेश नरेंद्र मोदी यांनी आजच्या सभेच्या सुरूवातीला बोलताना केला. राजकीय पंडितांचे अंदाज लोकसभा निवडणूकीत पार चुकले होते. कारण त्यांनी त्यांच्या परंपरागत फुटपट्ट्या लावत जुन्या तराजूत तोलून अंदाज बांधले होते. मात्र हे करीत असताना देशातील तरुणाईच्या भावनांचा हुंकार त्यांना समजला नाही परिणामी त्यांचे अंदाज चुकले. आता पुन्हा ते जुन्याच पद्धतीने अंदाज लावू बघत आहेत. यावेळी त्यांचे अंदाज चुकले तर मला वाईट वाटेल असा टोला त्यांनी लगावला. तसेच, नागपुरातील महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्प गेल्या १५ वर्षापासून कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नाकर्तेपणामुळे रखडल्याकडे नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात लक्ष वेधले. त्यावर बोलतांना हा प्रकल्प आता माझ्या कार्यकाळात पूर्ण होईल आणि त्याचे उद्घाटन मीच करीन अशी घोषणा मोदी यांनी केली. यावेळी मोदींच्या उपस्थितीत शहर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयप्रकाश गुप्ता यांच्या नेतृत्त्वात ५५ प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपपक्षात प्रवेश केला. नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि महाराष्ट्र मुस्लिम इन्टेलेक्च्युअल फोरमचे आमंत्रक डॉ. एस.एन.पठाण यांच्या नेतृत्त्वात बुद्धिवादी मुस्लिमांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केला.
