भारतातील डेंगीविषयीचे सत्य

dengue
वॉशिंग्टन – अलीकडच्या काळात भारतामध्ये डेंगी विकाराचे प्रमाण वाढलेले आहे. या विकारावर सरकारचे नियंत्रण तर नाहीच, पण समाजात सुद्धा या विषयात फारशी जागृती नाही. त्यामुळे डेंगीच्या रुग्णांची नोंद करण्याच्या बाबतीत सुद्धा उदासीनता दिसून येते. २००६ ते २०१२ या सात वर्षात भारतात सरासरी दरवर्षी २० हजार ५०० जणांना डेंगीची बाधा झाली असे सरकारी आकडे सांगतात. याच आकड्यांमध्ये या सात वर्षात दरवर्षी सरासरी १३२ लोक या विकाराने मरण पावले, असे दाखवलेले आहे.

अमेरिकेतल्या मॅसॅच्युसेटस् प्रांतातील एका संस्थेने दिल्लीतल्या एका स्वयंसेवी संघटनेच्या मदतीने आणि तामिळनाडूतील मदुराई येथील एका वैद्यकीय संस्थेच्या साह्याने या संबंधातील खरे आकडे शोधून काढले. तेव्हा एक धक्कादायक माहिती अशी बाहेर आली की, सरकार सांगते त्याप्रमाणे डेंगीची बाधा होणार्‍यांची सरासरी संख्या २० हजार नसून त्याच्या तीनशे पटीने जास्त म्हणजे ६० लाख एवढी आहे. या संस्थांच्या या पाहणीमुळे शासनाच्या उदासीनतेवर चांगलाच प्रकाश पडत आहे.

या संस्थांनी हा धक्कादायक निष्कर्ष काढणारी पाहणी केली तेव्हा तिच्यासाठी सरकारी माहितीचाच आधार घेतला. शिवाय डेंगीचे निदान करणार्‍या प्रयोगशाळातले अहवाल सुद्धा वापरले. त्यातूून त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की, भारत हा डेंगीचा प्रचार करणारा सर्वात मोठा देश आहे. जगात दरवर्षी साधारण ३९ कोटी लोकांना डेंगीची बाधा होते. हा आकडा शंभर देशांच्या पाहणीतून प्राप्त झाला आहे. या ३९ कोटींपैकी ६० लाख लोक एकट्या भारतातले असतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment