फ्लिपकार्टविरोधात अनेक तक्रारी – निर्मला सीतारमन

nirmla-sitaraman
मुंबई – केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारमन यांनी फ्लिपकार्टकडून सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या बिग बिलियन डे योजनेबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, आम्हाला याबाबतीत भरपूर माहिती प्राप्त झाली आहे. अनेक लोकांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून आम्ही या प्रकरणी लक्ष घालू, असे देखील त्यांनी सांगितले. फ्लिपकार्टकडून मोठ्या प्रमाणात देण्यात येणार्‍या सवलतींबरोबरच विक्रीचा आकडा जाहीर करण्याविरोधात व्यापार्‍यांकडून मिळालेल्या अनेक तक्रारीनंतर बुधवारी केंद्र सरकारने या तक्रारींवर विचार करणार असल्याचे सांगितले. याशिवाय ई-कॉमर्स घाऊक विक्रीच्या कारभारात अजून स्पष्टता आणण्याची गरज आहे का याबाबतीत देखील विचार करण्यात येणार आहे.

केंद्र सरकार ई-कॉमर्सवरील घाऊक विक्रीच्या क्षेत्राबाबत विशेष धोरणे आखण्याबाबत काही विचार करत आहे का असे विचारले असता निर्मला सीतारमन यांनी सांगितले की, आम्हाला या प्रकरणी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आम्ही या प्रकरणाचा अभ्यास करू. काही वेगळी धोरणे आखणे गरजेचे आहे की व्यापार निती स्पष्ट करायची गरज आहे, याबाबतीत आम्ही लवकरच सांगू, असे त्या म्हणाल्या. याच आठवड्यात देशातील व्यापार्‍यांची मुख्य संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडियाने (कैड) निर्मला सीतारमन यांच्याकडे ई-कॉमर्स संकेतस्थळांकडून केल्या जाणार्‍या विक्रीवर नजर ठेवण्याची आणि विक्री संदर्भातील नियम बदल्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलण्याची मागणी केली होती.

Leave a Comment