गडकरी आणि फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

combo2
नागपूर – नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार सत्तेत आल्यावर आम्ही वेगळा विदर्भ देवू अशी घोषणा केली होती. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे तुकडे करणार नाही अशी घोषणा करून या दोन्ही नेत्यांची केंद्रात काय इज्जत आहे हे दाखवून दिले आहे. त्याचबरोबर या दोन्ही नेत्यांनी वैदर्भीय जनतेचा अपमान केला आहे. जनतेला उल्लू बनवले आहे. त्यामुळे आपली विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदांचे राजीनामे द्यावे अशी मागणी कॉंग्रेसचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी केली.

काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धुळे आणि बुलढाण्यातील सभेत महाराष्ट्राचे तुकडे होवू देणार नाही अशी घोषणा केली तर नागपूरच्या सभेत ते वेगळ्या विदर्भाच्या मागणीवर काहीही बोलले नाहीत. या संदर्भात मुत्तेमवार यांनी आज बोलावलेल्या एका पत्रपरिषदेत फडणवीस आणि गडकरी यांच्यावर जोरदार शरसंधान केले. गडकरी आणि फडणवीस यांनी वेगळ्या विदर्भाचे समर्थन केले होते. भाजपही छोट्या राज्यांच्या मागणीचे समर्थन करीत होता. पक्षाने भुवनेश्वरच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत वेगळ्या विदर्भाच्या मागणीला समर्थन देणारा ठराव केल्याचे गडकरी, फडणवीस आणि मुनगंटीवार वारंवार सांगत होते. आता केंद्रीय मंत्रीमंडळात गडकरींना कवडीचीही किंमत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यांनी विदर्भाच्या नावावर लोकांची मते घेतली आणि आता त्यांचे पंतप्रधानच वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर अडसर बनले आहेत. त्यामुळे गडकरी आणि फडणवीस यांनी या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा जनता त्यांना माफ करणार नाही असे मुत्तेमवार यांनी यावेळी ठणकावले.

वेगळा विदर्भ या मुद्यावर कॉंग्रेसनेही आतापर्यंत नकारार्थीच भूमिका घेतली याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता मुत्तेमवार म्हणाले, की आमच्या नेत्यांनी विदर्भ देतो असे कधीच म्हटलेले नाही. त्यांचा कायम विरोधच होता. मात्र भाजपच्या नेतृत्त्वाने वेगळ्या विदर्भाला समर्थन दिले होते. त्यामुळे आता त्यांना परत फिरता येणार नाही. मिहानच्या नावावरही मोदींनी काल नागपूरच्या सभेत वैदर्भीय जनतेला उल्लू बनवले असा आरोपी मुत्तेमवार यांनी यावेळी केला. मोदींनी एक वर्षात मिहानचे उद्घाटन करतो अशी घोषणा केली मात्र एक वर्षात मिहान पूर्ण होणे शक्य नाही त्यासाठी किमान तीन वर्ष लागतील असा दावा त्यांनी केला. मते घेण्यासाठी हा खेळ होता अशी टिका त्यांनी केली. येत्या निवडणूकीत नागपूर शहरातील सहाही उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी हेतील असा विश्वास मुत्तेमवार यांनी यावेळी व्यक्त केला. कॉंग्रेसच्या प्रचारासाठी विदर्भात पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, अजय माकण, ज्योतीरादित्य सिंधीया, दिग्विजय सिंह आदी नेते विदर्भाचा दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Leave a Comment