२४ तास ऑन ड्युटी राहून वैतागले मुंबई पोलीस

policew
मुंबई – गेल्या महिनाभरापासून मुंबई पोलिसांवर सतत बंदोबस्ताच्या ड्युटीची टांगती तलवार असल्याने बहूसंख्य पोलीस कर्मचारी आता वेगवेगळ्या आरोग्याच्या तक्रारींनी ग्रस्त आहेत. सण आणि उत्सवांसाठी पोलिसांना जास्तीचे काम करावेच लागते. मात्र यावेळी ऐन सण उत्सवाच्या काळात आलेल्या निवडणुकींच्य़ा बंदोबस्ताने त्यांचे कंबरडे मोडले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६० टक्क्यांपेक्षा जास्त मुंबई पोलीस वातावरण बदलामुळे होणार्‍या रोगांचे बळी पडले आहेत आणि त्यांना दिवाळी होईपर्यंत सुट्टी मिळणार नाही. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, साथीच्या रोगाने दररोज अनेकजण आजारी पडत आहेत. पण तरिही त्यांना पोलीस ठाण्यात येऊन ड्युटी मात्र करावी लागत आहे.

निवडणुका संपेपर्यंत कोणालाही सुट्टी मिळणार नाही. पोलिसांच्या सर्व सुट्ट्या १९ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणालाही आजारपणाची सुट्टीदेखील घेता येत नाही आणि कोणी सुट्टी घेतलीच तर त्याच्यावर विभागीय कारवाईला सामोरे जाण्याची नामुष्की ओढावणार आहे. अनेक तास बंदोबस्तासाठी उभे राहिल्याने आणि सतत हवामान बदलाने ६० टक्के पोलीस दल सर्दी, खोकला आणि ताप याने हैराण झाले आहे. याशिवाय मधुमेह, रक्तदाब आणि हृद्यविकार यामुळेदेखील ३० टक्के पोलीस आजारी आहेत. मागील दोन आठवड्यात कामाच्या अतिताणाने तीन पोलीस मृत्यू पावले आहेत. २४ तास ऑन ड्युटी असणारे १० हजार पोलीस कर्मचारी त्यामुळे दिवाळी कधी होते, याची वाट पाहत बसले आहेत. मुंबई पोलिसांचे प्रवक्ता धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, पोलिसांना तंदुरुस्तीसाठी दररोज सूचना दिल्या जात आहेत. वैयक्तिक व्यायाम, आरोग्यविषय़क सवयी तसेच जेवण यावर लक्ष देण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आम्ही पोलीस दलात येत असतानाच २४ तास काम करण्याच्या मानसिकतेने येत असतो, त्यामुळे तक्रार कोणी करत नाही. पोलिसांना पोलीस कल्याण योजना आणि कुटुंब आरोग्य योजनाद्वारे कुटुंबाच्या आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मदत केली जाते.

Leave a Comment