सणासुदीतही भारनियमनाचे संकट

loadsheadiing
नागपूर – पावसाने मारलेली दडी आणि सणासुदीमुळे यंदा विजेच्या मागणीत विक्रमी वाढ झाली आहे. दुसरीकडे कोळसा आणि गॅसच्या टंचाईमुळे विजेची तूट निर्माण झाली आहे. सर्व स्रोतांतून वीज उपलब्ध करून महावितरण विक्रमी वीजपुरवठा करीत असले तरी विजेची तूट कायम असल्याने राज्यातील जनतेला सणासुदीतही भारनियमनाला समोरे जावे लागण्याची शक्यता आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, १ ऑक्टोबरला राज्यात १६ हजार ८१३ मेगावॉट विजेची मागणी होती. महावितरणने सर्व स्रोतांतून वीज उपलब्ध करून १६ हजार २७८ मेगावॉट विजेचा पुरवठा केला. या दिवशी ५३५ मेगावॉटचे भारनियमन करण्यात आले. २ ऑक्टोबरला १६ हजार २०४ मेगावॉट विजेची मागणी होती. त्या तुलनेत १६ हजार ९९ मेगावॉटचा वीजपुरवठा करण्यात आला असून, १०५ मेगावॉटचे भारनियमन करण्यात आले. दसèयाच्या दिवशी मात्र विजेची मागणी खाली घसरली. या दिवशी १५ हजार १५९ मेगावॉट विजेची मागणी होती. त्या तुलनेत १५ हजार १८ मेगावॉट विजेचा पुरवठा करून १४१ मेगावॉट विजेचे भारनियमन करण्यात आले. चार ऑक्टोबरला राज्यात १७ हजार ६९४ मेगावॉटवर पोहोचली. त्या तुलनेत १६ हजार ७२१ मेगावॉटचा पुरवठा करून ९७३ मेगावॉटचे भारनियमन केले. ५ ऑक्टोबरला राज्याची विजेची मागणी १७ हजार १७३ मेगावॉट होती. त्या तुलनेत १६ हजार ७०५ मेगावॉट वीज उपलब्ध होऊन ४१८ मेगावॉट विजेची भारनियमन करण्यात आले. एकीकडे विजेच्या मागणी विक्रमी वाढ असतानाच दुसरीकडे कोळशा आणि गॅसच्या तुटवड्यामुळे कमी वीज उपलब्ध होत आहे. सर्व स्रोतांतून वीज घेऊनही मागणी पुरवठ्यातील तूट पूर्णत: निकाली काढणे शक्य होत नसल्याने भारनियमन आगामी काळातही सुरूच राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Comment