मायक्रोसॉफ्टच्या विवादामुळे नोकियाने चेन्नईतील उत्पादन थांबविले

nokia
नवी दिल्ली – आघाडीची मोबाइल कंपनी नोकियाने मंगळवारी चेन्नईमधील उत्पादन प्रकल्प नोव्हेंबर महिन्यापासून बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. मायक्रोसॉफ्टकडून पुढील काळातील उत्पादनांची मागणी न आल्याने नोकियाने आपले हॅंडसेटचे उत्पादन थांबविण्याचे ठरविले असून श्रीपेरुमबुदूर येथील प्रकल्प बंद करण्यात येणार आहे. याठिकाणी मायक्रोसॉफ्टसाठी हॅंडसेट तयार केले जात होते आणि वार्षिक ७.२ दशलक्ष डॉलर्स उत्पादनाचा करार एप्रिल महिन्यात संपुष्टात आला आहे. नोकियाने आता मायक्रोसॉफ्टसोबत नवा करार झाला नसल्याने सध्याचे प्रकल्प थांबविण्याचे ठरविले आहे. नोकियाने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनानुसार, मायक्रोसॉफ्टने नोकियाला कळविले आहे की, ते त्यांच्या सेवा घेण्याचे थांबवत आहेत. दोन्ही कंपन्यांतील करविषयक विवादांमुळे पुढील काळातील करार करण्यात येणार नाहीत. त्यामुळे नोकियाच्या सहा हजार कर्मचार्‍यांवर आता बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळणार आहे. २१,००० कोटी रुपयांच्या आयकर आणि इतर करांच्या भरणाबाबत नोकिया आणि मायक्रोसॉफ्टमध्ये विवाद झाला आहे आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. नोकियाने म्हटले आहे की, या टाळेबंदीबाबत कामगार आयुक्तांना रीतसर सूचना देण्यात आली आहे. जबाबदार नियोक्ता म्हणून नोकियाने आपल्या कामगारांना याआधीच नोटिसा दिल्या असून त्यांना त्यांच्या रोजगाराच्या नवीन संधी शोधण्याची मुभा दिली आहे.

Leave a Comment