भाजपचे सरकार हाच जनतेचा निर्धार : विनोद तावडे

vinod-tawde
अमरावती – केंद्रात जसे नरेंद्र मोदी यांचे सरकार त्याचप्रमाणे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आणायचे आहे. ज्या राज्यात एकाच पक्षाचे सरकार, त्या राज्याचा विकास झाला. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला बहुमत देण्याचा निर्धार जनतेने केला आहे, असा विश्वास आमदार विनोद तावडे यांनी येथील सभेत व्यक्त केला. छोगालाल राठी गुरुकुल विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, पंधरा वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने तीन लाख कोटींवर कर्ज केले. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या डोक्यावर सत्तर हजार रुपये कर्ज आहे. या सरकारच्या काळात ११ लाख ८८ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला. त्या प्रत्येक पैशाची चौकशी केल्याशिवाय मी राहणार नाही. चौकशीत जो कुणी दोषी आढळेल, त्याला तुरुंगात डांबल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला पंधरा वर्षे सत्तेत बसवले, मात्र विदर्भात सिंचनाचा अनुशेष कायम आहे. कुपोषण मोठ्या प्रमाणात आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. भारतीय जनता पक्षाचे सरकार आले, तर आमचा एक नारा नक्की आहे. आम्ही महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करणार आहोत, असेही तावडे म्हणाले.

सरकारी कर्मचार्‍यांचा गोपनीय अहवाल दरवर्षी बनतो. या अहवालाच्या आधारे त्याला बढती दिली जाते. आमचे सरकार आले तर चार शेतकर्‍यांचे प्रमाणपत्र मागितले जातील. त्याआधारेच कर्मचार्‍यांचा अहवाल लिहिला जाईल. त्यानंतरच त्याला बढती मिळेल. भारतीय जनता पक्षाचे सरकार निवडून दिल्यास शासकीय अधिकाऱ्यामागे तुम्हाला धावावे लागणार नाही. तुमच्या मागे अधिकारी धावतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.शेतकर्‍यांच्या जमिनी संपादन करताना जैतापूर ऊर्जा प्रकल्पाला नवी मुंबई विमानतळातील बाजारभाव दिला जातो तर मग भातकुली तालुक्यातील निम्नपेढी प्रकल्पग्रस्तांना बाजारभावाप्रमाणे मोबदला दिला पाहिजे. यातसुद्धा भ्रष्टाचार झाला. ज्यांनी तो केला त्यांची यादी तयार करून त्यांचा हिशेब चुकता करणार असल्याचे ते म्हणाले.

Leave a Comment