फ्लिपकार्टने १० तासांत केली १० कोटी डॉलर्सची विक्री

flipcart
बंगळुरू – देशातील सर्वात मोठी ऑनलाइन रिटेल कंपनी असलेल्या फ्लिपकार्टने सोमवारी भारताच्या ई-कॉमर्स क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. सहा ऑक्टोबर रोजी कंपनीने संकेतस्थळावरील अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणावर सूट जाहीर केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संकेतस्थळावर ग्राहकांची झुंबड उडाल्याने काहीवेळातच संकेतस्थळ क्रॅश झाले. सोमवारी दिवसभरात संकेतस्थळाला सुमारे एक अब्ज लोकांनी भेट दिली असून या एका दिवशी कंपनीने ६१५ कोटी रुपयांची विक्रमी विक्री केली आहे. याबाबत बोलताना कंपनीचे सहसंस्थापक सचिन व बिन्नी बन्सल यांनी सांगितले की, हा आमच्यासाठी एक अभूतपूर्व दिवस होता.

कंपनीतर्फे आज जाहीर करण्यात आलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे की, आमच्या संकेतस्थळाला सोमवारी सुमारे एक अब्ज लोकांनी भेट दिली आणि २४ तासांत १० कोटी डॉलर (६१५ कोटी रुपये) विक्रीचे निश्चित केलेले लक्ष्य आम्ही फक्त १० तासांत गाठले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर संकेतस्थळाला भेट दिल्याने तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे समूह संपर्क माध्यमांवर कंपनीच्या विरुद्ध अनेक तक्रारी नोंदविण्यात आल्या. कंपनीच्या एका प्रवक्त्याने याबाबत बोलताना सांगितले की, एकाचवेळी अनेक लोकांनी संकेतस्थळाला भेट दिल्याने एका अंतर्गत सर्व्हरमध्ये समस्या निर्माण झाली. त्यामुळे काही वेळासाठी मागणी नोंदविण्यात अडचण निर्माण झाली होती. मात्र काही वेळातच ही समस्या दूर करण्यात आली.

Leave a Comment