पुढील वर्षी भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ होण्याची जागतिक बॅंकेला आशा

world-bank
नवी दिल्ली – दक्षिण आशियातील एकूण उत्पादनात ८० टक्के योगदान असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेत पुढील आर्थिक वर्षात ६.४ टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचे जागतिक बॅंकेकडून आज सांगण्यात आले. चालू आर्थिक वर्षात हा दर ५.६ टक्के इतका आहे. जागतिक बॅंकेच्या दक्षिण आशिया आर्थिक फोकस अहवालात सांगण्यात आले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील नवे सरकार स्थापन झाल्याने उंचावलेल्या अपेक्षांमुळे देशातील आर्थिक घडामोडींमध्ये वाढ झाली असून भारताला ‘मोदी लाभांशा’चा फायदा मिळत आहे. चालू आर्थिक वर्षातील तसेच पुढील आर्थिक वर्षातील वाढीच्या वेगाला अमेरिकन अर्थव्यवस्थेतील सुधारणांचा देखील हातभार लागेल. तसेच त्यामुळे भारतामधून वस्तु आणि सेवांच्या निर्यातीला बाजार उपलब्ध होऊ शकेल, असे देखील या अहवालात सांगण्यात आले आहे.

या अहवालात पुढे सांगण्यात आले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या घसरणार्‍या किंमतीचा परिणाम देखील दक्षिण आशिया विभागातील देशांच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येणार आहे. भारताला जर अर्थव्यवस्थेतील दीर्घकालीन वाढ प्राप्त करायची असेल तर आर्थिक सुधारणांचा वेग वाढविण्याची गरज असल्याचे देखील या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जागतिक बॅंकेच्या दक्षिण आशिया विभागाचे मुख्य अर्थशास्त्री मार्टिन रामा यांनी सांगितले की, दक्षिण आशियामध्ये पुढील आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणावर आर्थिक स्थिरता पाहायला मिळू शकेल. या कालावधीत अर्थव्यवस्था वाढीच्या दरातील तेजीबरोबरच वित्तीय आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणांकडे कल असल्याचे देखील दिसून येईल, असे देखील त्यांनी सांगितले.

Leave a Comment