निवडणूक नियंत्रण कक्षाचा टोल फ्रीनंबर ठरतो आहे बिनकामी !

toll
ठाणे – ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघासाठी असलेल्या निवडणूक नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक केवळ नामधारी असून या क्रमांकावर निवडणूक संदर्भात तक्रार अथवा माहिती मागितली असता हा क्रमांक २४ तास आपत्कालीन सेवेसाठी असल्याचे उत्तर मिळत आहे. तब्बल १८ मतदारसंघात अवघे १० आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. तेव्हा,निवडणूक यंत्रणेचा कारभार रामभरोसे सुरु असल्याची चर्चा होत आहे.मतदारांना भेडसावणाऱ्या समस्या,तसेच मतदारसंघातील अडचणी किंवा तक्रारी करण्यासाठी आणि आदर्श आचारसंहिता व मतदार मदतीसाठी जिल्हास्तरावर १८००-२२१९५३ ही टोल फ्री क्रमांकाची हेल्पलाईन २४ तास सेवारत ठेवणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी पी.वेल्लारासू यांनी दिली होती .मात्र,या क्रमांकावर संपर्क केला असता या कक्षातील लिपिक सोडेगावकर यांनी हा आपत्कालीन कक्षाचा नंबर असल्याचे सांगून निवडणुकी संदर्भातील माहिती देण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे,एकीकडे मतदारराजाची गैरसोय होत असून उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाही नाहक हेलपाटे घालून माहिती घ्यावी लागत आहे.दरम्यान,मतदानाला काही दिवस शिल्लक आहेत. त्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहिरातबाजी करून मतदानाचा टक्का वाढविण्याची मोहीम सुरु केली असताना अद्याप मतदार स्लीप मतदारांपर्यंत पोहोचवण्यात अपयश आले आहे. तरीही निवडणूक जाहीर झाल्यानंतर १८ मतदारसंघात अवघे १० आचारसंहितेचे गुन्हे दाखल झाले असून यात केवळ विनापरवाना बॅनर, फलक आणि बेकायदा झेंडे लावल्याच्या तक्रारींची संख्या अधिक आहे.

Leave a Comment