काहीतरी मिळत असल्यामुळे राज ठाकरे आंदोलन अर्धवट सोडतात : रामदास आठवले

ramdas
नागपूर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे हे कोणतेच आंदोलन पूर्णत्वास नेत नाही. कारण आंदोलन अर्धवट सोडण्यासाठी त्यांना काहीतरी मिळत असावे म्हणूनच आंदोलन अपूर्ण राहते. अशा नेत्याला फारसे गंभीरपणे का घ्यायचे असा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केला. विदर्भात प्रचार दौर्‍यासाठी आले असता नागपुरात पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, राज ठाकरेंनी कोणतेच आंदोलन पूर्ण केले नाही. आताही ते फक्त इतरांवर टीका करतात. स्वत: काहीही करत नाही. अशा परिस्थितीत राज ठाकरे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत कुठेही स्पर्धेतच नाहीत असा दावा आठवले यांनी केला. राज ठाकरे माझी नक्कल करतात. त्यांना अभिनयाची इतकीच आवड असेल तर त्यांनी नाटक, चित्रपट किंवा टॉकशोमध्ये जावे. त्यांना हवे असेल तर त्यांच्यासाठी मीही शब्द टाकायला तयार आहे असा टोला त्यांनी लगावला. नरेंद्र मोदींना राज्यात प्रचारसभा घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोक त्यांना ऐकायला येतात म्हणून त्यांच्या प्रचारसभा आम्ही आयोजित करतो. डॉ. मनमोहन सिंग यांच्याही प्रचारसभांचे कधीकधी आयोजन व्हायचे पण ऐकायला लोकच यायचे नाहीत त्यामुळे ते सभा घेत नव्हते. मोदी घेतात त्याचा तुम्हाला राग का असा सवाल आठवले यांनी केला. सीमेवर गोळीबार सुरू असताना मोदी सभा घेतात यावर झालेल्या विरोधकांच्या टीकेचाही आठवलेंनी समाचार घेतला. मोदींनी बंदूक घेवून सीमेवर जावे अशी तुमची अपेक्षा आहे काय असा प्रश्न विचारत सीमांचे रक्षण करण्यासाठी आमचे सैनिक समर्थ आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राहुल गांधींनीही मोदींच्या दुप्पट सभा महाराष्ट्रात घ्याव्या आमची हरकत नाही असेही त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी शिवसेना भाजप युती तुटल्यावर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला अशी माहिती देवून मला उपमुख्यमंत्री पदाचा मोह नाही असेही आठवले यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. नरेंद्र मोदी हे देशातील सक्षम नेते आहेत. दलितांप्रती देखील त्यांनी सौहार्दपूर्ण भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही राहणार हे आता निश्चित आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. रिपाईअर्जुन डांगळे हेही भाजपसोबत जाण्याच्याच मतांचे होते. मात्र शिवसेनेला आमच्यात फुट पाडायची होती. त्यामुळे त्यांनी टाकलेल्या गळाला डांगळे अडकले, असा युक्तीवाद आठवले यांनी यावेळी बोलतांना केला.

Leave a Comment