देशभरातील २१ विद्यापीठे बनावट,‘यूजीसी’ च्या अहवालाद्वारे झाले स्पष्ट

ugc
मुंबई – देशातील २१ विद्यापीठांच्या पदव्या बनावट असल्याची माहिती केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने दिली आहे. केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोग दरवर्षी देशातील विद्यापीठांचा आढावा घेऊन त्यांची छाननी करत असते. त्या छाननीनंतर विद्यापीठ अनुदान आयोग कायदा १९५६नुसार या बनावट विद्यापीठांची यादी यूजीसीने आपल्या वेबसाइटवर जाहीर केली. यात उत्तर प्रदेशातली सर्वाधिक नऊ विद्यापीठांचा समावेश असून राज्यातील नागपूरच्या राजा अरेबिक या विद्यापीठाचाही समावेश आहे. या विद्यापीठांच्या पदव्याही बनावट ठरणार असल्याने या विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न उभा ठोकला आहे.

यूजीसीने जाहीर केलेल्या या यादीत सर्वाधिक विद्यापीठे उत्तर प्रदेशातील असून त्यानंतर दिल्ली, बिहार, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील विद्यापीठांचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसेय संस्कृत विद्यापीठ वाराणसी, महिला ग्राम विद्यापीठ, गांधी हिंदी विद्यापीठ, नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यापीठ, उत्तर प्रदेश विद्यापीठ कोशी कला- मथुरा, महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विद्यापीठ, इंद्रप्रस्थ शिक्षा परिषद इन्स्टिट्यूशन्स एरिया- खोडा, माकनपूर विद्यापीठ, गुरुकुल विद्यापीठ आणि नॅशनल युनिवर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपथी या विद्यापीठांचा समावेश आहे.