
दुबई – वेस्ट इंडिजविरोधातील आगामी मालिकेत चांगली कामगिरी नोंदवून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्य़ाची संधी विराट कोहलीकडे आहे. भारत आणि वेस्ट इंड़िजमध्ये होणार्या मालिकेत पाच एकदिवसीय सामने, तीन कसोटी सामने आणि एका टी-२० सामन्याचा समावेश आहे. बुधवारपासून दोन्ही देशांमध्ये एकदिवसीय सामन्यांना सुरुवात होणार आहे. सद्यस्थितीला कोहली एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत तिसर्या स्थानावर आहे. या वर्षभरात अव्वल स्थान गाठण्यात त्याला यश आले होते. मात्र त्यानंतर त्याची त्या स्थानावरुन घसरण झाली होती.
विराट कोहलीला क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची संधी
आयसीसीने याबाबतीत एक निवेदन जारी केले असून, त्यांनी म्हटले आहे की, कोहली सध्या अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या अब्राहम डिव्हिलयर्सपेक्षा २४ गुणांनी आणि दुसर्या स्थानावर असलेल्या हाशिम आमलापेक्षा तीन गुणांनी पिछाडीवर आहे. या क्रमवारीत अव्वल दहा फलंदाजांमध्ये भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी सहाव्या स्थानावर तर शिखर धवन सातव्या स्थानावर विराजमान आहेत. एकदिवसीय अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताचा रविंद्र जाडेजाच्या तिसर्या स्थानावर असून, दुसर्या स्थानावर असलेले श्रीलंकन खेळाडू एंजेलो मॅथ्युजपेक्षा तो १५ गुणांनी पिछाडीवर आहे. या मालिकेत चांगली कामगिरी नोंदवून आपल्या क्रमवारीत सुधारणा कऱण्याची संधी जाडेजाकडेदेखील आहे.
