मुख्यमंत्री होण्यास स्वारस्य नाही, गडकरींचा स्पष्ट खुलासा

gadkari
मुंबई – भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय जनता पक्षाला किमान १५० किंवा त्यापेक्षा जास्त जागांवर विजय मिळेल आणि स्वबळावर पक्ष सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. लोकसभेच्या निवडणूकीनंतर राजकीय स्थिती बदलली असली तरी लोकांना आता आघाड्यांचे राजकारण नको आहे, त्यामुऴे केंद्रात जसे भाजपला पूर्ण बहुमत मिळाले तसे राज्यातही मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. असे झाले तरी, आपल्याला महाराष्ट्रात मुख्यमंत्री होण्यापेक्षा केंद्रातच मंत्री म्हणून काम करायला आवडेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यभर घेत असलेल्या सभांना उत्सफुर्त प्रतिसाद मिळत असून राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या सभांना देखील तेवढा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ते वैतागले असावेत, असेही गडकरी म्हणाले. सध्या पवार यांच्याकडे काम कमी असल्याने त्यांनी देखील मोदींसारखे प्रचारात उतरावे असे आव्हान गडकरी यांनी दिले आहे. पवारांनी भाजपची चिंता करू नये, स्वतःच्या पक्षाची काळजी घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे. घोटाळेबाजांचा पक्ष अशी राष्ट्रवादीची प्रतिमा असून या निवडणूकीत जनता त्यांना धडा शिकवेल, असे गडकरी म्हणाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा निष्क्रिय मुख्यमंत्री गेल्या ५० वर्षांत महाराष्ट्राला मिळाला नाही अशी टिका करून गडकरी म्हणाले की, सामान्य माणसाच्या नावाने सत्ता मिळवून कॉंग्रेसने त्यांची कोणतीही कामे केलेली नाहीत. शिवसेना-भाजपची युती तुटण्यास उद्धव ठाकरे यांची भूमिकाच कारणीभूत आहे, असे स्पष्ट करून उद्धव यांनी लवचिक भूमिका घेतली असती तर युती टिकली असते असेही गडकरी म्हणाले.

Leave a Comment