मारुती सुझुकीने भारतीय बाजारांत दाखल केली ‘सियाझ’

ciyaz
नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादन कंपनी असलेल्या मारुती सुझुकी कंपनीने आज सेदान प्रकारातील सियाझ गाडी भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. या गाडीच्या पेट्रोल आवृत्तीची दिल्लीमधील एक्स-शोरूम किंमत ६.९९ लाख ते ९.३४ लाख रुपयांदरम्यान तर डिझेल आवृत्तीची किंमत ८.०४ लाख ते ९.८० लाख रुपयांदरम्यान असल्याचे देखील कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

मारुती सुझुकी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केनिचि आयुकावा यांनी यावेळी सांगितले की, भारतातील कोट्यावधी लोक गेल्या अनेक वर्षांपासून मारुती सुझुकीच्या गाड्यांचा वापर करत आहेत. ज्या ग्राहकांना मध्यम आकाराची सेडान गाडी घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सियाझची निर्मिती करण्यात आली आहे. सियाझची रचना भारतातील सेडान ग्राहकांची आवश्यकता आणि अपेक्षा यांना लक्षात घेऊन करण्यात आली आहे, असे देखील यावेळी आयुकावा यांनी सांगितले. सियाझची विक्री वाढविण्यासाठी कंपनीने आपल्या विक्रेत्यांसोबत सुमारे ६२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या गाडीची रचना पूर्णपणे नव्याने करण्यात आली आहे. घरगुती बाजारपेठ वगळता या गाडीची निर्यात पश्चिम आशिया, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेमध्ये करण्याची देखील कंपनीने योजना बनविली आहे. भारतीय बाजारात या गाडीसमोर होंडा सिटी आणि ह्युंदाई व्हर्ना या गाड्यांचे आव्हान असणार आहे. मारूतीने सियाझची आगाऊ नोंदणी कंपनीतर्फे गेल्या महिन्यात सुरु करण्यात आली होती आणि आत्तापर्यंत कंपनीकडे आत्तापर्यंत १०,००० लोकांनी या गाडीची मागणी नोंदविली आहे, अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली.

Leave a Comment