शिवसेना आणि अनुल्लेख

shivsena
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात झालेल्या सभांमध्ये त्यांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यात भाजपा आणि शिवसेना यांच्यातली कटुता वाढत असतानाच या सभा झाल्या. शिवसेनेचे नेते भाजपावर प्रखर टीका करत आहेत. आदित्य ठाकरे तर भाजपावर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करीत आहेत. भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्यावर उलट टीका करणार नाही असे म्हटले होते पण तेसुध्दा शिवसेनेपेक्षा थोड्या कमी प्रमाणात का होईना परंतु शिवसेनेवर प्रतिटीका करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात प्रचाराला येतील तेव्हा मात्र ते शिवसेनेला चोख उत्तर देतील असे बर्‍याच माध्यमांना वाटले होते. असा त्यांचा अंदाज चूक ठरला. त्यांना मोदी हा माणूस काय आहे हेही कळलेले नाही आणि राजकारणात काय होणार याचा अचूक अंदाजही त्यांना येत नाही. किंबहुना कसल्याही प्रकारचे सखोल चिंतन न करता ठोकून देण्याची त्यांची सवय आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून काही माध्यमांनी मोदींच्या चोख उत्तराचे निदान केले होते. परंतु मोदींनी त्यांचा अपेक्षाभंग केला. ही माध्यमे एका जुगलबंदीची अपेक्षा करीत होती. पण त्यांची निराशा झाली. मोदींनी आपण बाळासाहेबांना श्रद्धांजली म्हणून शिवसेनेवर टीका करणे टाळणार आहोत असे म्हणत सर्वांनाच उत्तर दिले. शिवसेनेकडून ओढल्या जाणार्‍या भाजपाविरोधी टीकेच्या रेषा लहान करण्यासाठी मोदींनी स्वतःची अशी मोठी सकारात्मक रेषा ओढली आणि शिवसेनेचा उल्लेखसुध्दा न करता शिवसेनेला उत्तम उत्तर दिले.

उध्दव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, दिवाकर रावते यांनी जी काही अतार्किक टीका केली आहे. तिला, अरेला कारे या न्यायाने उत्तर दिले असते तर मोदी लहान झाले असते. नाही तरी मोदी काय टका करणार होते? शिवसेनेचे नेते म्हणत आहेत, भाजपामुळे युती तुटली. तिला उत्तर द्यायचे असते तर मोदी म्हणाले असते, आमच्यामुळे नाही तर शिवसेनेमुळे युती तुटली. पण यातून काय निष्पन्न झाले असत ?े शिवसेनेचे नेते भाजपावर टीका करून हास्यास्पदच ठरत आहेत. नरेंद्र मोदी तसेच हास्यास्पद ठरले असते. शिवसेनेच्या नेत्यांकडे भाजपाशिवाय काही विषय नाही. पण मोदींचे तसे नाही. त्यांच्याकडे शिवसेनेपेक्षा खूप विषय आहेत आणि ते सकारात्मक आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या तोंडाला न लागता नरेंद्र मोदी यांनी त्यांचा उल्लेख टाळला. शेवटी आपण ज्यांच्याबरोबर २५ वर्षे युती केलेली आहे त्यांच्यावर काहीही टीका करायला गेलो तर ती टीका आपल्यावरच उलटत असते.

टीका ऐकणार्‍यांच्या मनामध्ये एक प्रश्‍न अभावितपणे उभा राहतो की, तुम्ही ज्यांच्यावर टीका करत आहेत ते एवढे वाईट आहेत, स्वार्थी आहेत, महाराष्ट्राचे शत्रू आहेत, भ्रष्ट आहेत तर मग त्यांच्याबरोबर २५ वर्षे युती केली कशाला? म्हणून मोदींनी शिवसेना हा विषय टाळला आणि त्यांच्या त्या सभा झाल्यापासून शिवसेनेचा भाजपाविरोधी सूरही थोडा सौम्य व्हायला लागला आहे. कारण आपण आज भाजपावर टीका करत असलो तरी भाजपप्रणित एनडीए आघाडीत आहोत. तिथून बाहेर पडलेलो नाही आणि आपला एक खासदार केंद्राच्या मंत्रिमंडळात आहे. याची जाणीव आता त्यांना व्हायला लागली आहे. नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातल्या त्यांच्या सभांमध्ये जनतेकडे भाजपाला स्पष्ट बहुमत देण्याची मागणी केली. मोदी लाट ओसरली आहे असे म्हणून स्वतःचे समाधान करून घेणार्‍यांनी मोदींच्या सभांना मिळालेला प्रतिसाद पाहिला तर या पुढे ते लाट ओसरली आहे असे म्हणण्याचे धाडस करणार नाहीत आणि केंद्रात जसा अनपेक्षितपणे भाजपाला जनतेचा स्पष्ट कौल मिळाला तसा महाराष्ट्रातसुध्दा अनपेक्षितपणे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरे म्हणजे भाजपाच्या विरोधात प्रचार करणार्‍या उध्दव ठाकरे, राज ठाकरे, नारायण राणे, आर. आर. पाटील, शरद पवार, छगन भुजबळ या सगळ्यांचे भाजपाविरोधी युक्तीवाद हे वरचेवर फुसके ठरायला लागले आहेत. नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिन आनेवाले है असे आश्‍वासन दिले होते. पण अच्छे दिन आले का असा प्रचार मोदी विरोधक करत आहेत. परंतु या प्रचारातला फोलपणा जनतेला तर माहीत आहेच पण स्वतः ते युक्तीवाद करणार्‍यांनाही माहीत आहे.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून पेट्रोलचे भाव पाचवेळा कमी झाले. कॉंग्रेसच्या साठ वर्षाच्या कारकिर्दीत असे कधी घडले होते का? या युक्तीवादाला कोणता मोदीविरोधक तर्कशुध्द उत्तर देऊ शकतो. गेल्या चार महिन्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचे भाव नियंत्रणात आहेत. हीही गोष्ट कोणी नाकारू शकत नाही. विशेषतः केवळ चार महिन्याच्या काळामध्ये चीन, जपान आणि अमेरिका या जगातल्या तीन आर्थिक महासत्तांशी मोदींनी सक्रीय संवाद सुरू करून दिला आहे. किंबहुना या संवादाची फळेही लवकरच दिसायला लागतील. ही गोष्ट सगळ्या जगाला दिसत आहे. १९९० पूर्वी अमेरिकेतल्या कित्येक लोकांना भारत देश आहे काय आणि कुठे हे सुध्दा माहीत नव्हते. अमेरिकेच्या माध्यमांत भारताची बातमी भिंग लावून शोधावी लागत होती. पण आता भारत हा विषय अमेरिकेच्या अजेंड्यावर वरच्या क्रमाने आलेला आहे. हे सगळ्या देशाला दिसत आहे. तेव्हा जगाच्या पातळीवर झळकणारा भारत ही मोदींची कमाई आहे. ती कोणीच नाकारू शकत नाही.

Leave a Comment