प्रादेशिक अजेंडा

vidhansabha
निवडणूक प्रचार जोरात सुरू झालेला आहे. प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. पण या धडाडणार्‍या तोफांच्या आवाजात सत्याचा आवाज क्षीण होऊ नये याची काळजी कोणीच घेत नाही. त्यामुळे तोफा धडाडतात आणि त्यातल्या असत्य निवेदनांनी लोकांच्या भावना भडकतात आणि सत्य मात्र उपेक्षित राहते. अशा भावना भडकवणार्‍या वाक्यांनी कदाचित त्यांना क्षणभरासाठी टाळ्या मिळत असतील परंतु त्यांचा बकवास हा पूर्णणे असत्य, असभ्य आणि अनैतिक असतो. त्यातल्या त्या नारायण राणे, आदित्य ठाकरे, छगन भुजबळ, उध्दव ठाकरे यांचे चौकार, षटकार पाहिल्यानंतर हसावे की रडावे हेच कळत नाही. शिवसेनेने गेल्या अनेक वर्षांपासून एक शिरस्ता नियमाने पाळला आहे. तो म्हणजे निवडणूक जवळ आली की मुंबई केंद्रशासित होणार अशी अफवा पसरवून द्यायची. १९७० च्या दशकामध्ये या अफवेच्या जोरावर शिवसेनेला अनेकदा निवडणुका जिंकता आल्या. परंतु आता पुन्हा एकदा शिवसेनेनी हीच आरोळी ठोकावी यापरते दुसरे दुर्दैव काय असेल? उध्दव आणि आदित्य ठाकरे केंद्रशासित होण्याची बांग ठोकत आहेत.

मात्र गेल्या २५ वर्षांमध्ये मुंबईला केंद्रशासित करण्याच्या दृष्टीने कोणत्याच पक्षाच्या सरकारने प्रत्यक्षही पाऊल पडलेले नाही आणि सूचक पाऊल तर अजिबात पडलेले नाही. असे असूनही उध्दव ठाकरे यांना पुन्हा पुन्हा तीच बांग ठोकावी लागत आहे. कारण त्यांच्याकडे आता दुसरा कोणताच ठोस मुद्दा राहिलेला नाही. खरे म्हणजे शिवसेनेची भाजपशी असलेली युती तुटली असली तरी महाराष्ट्रातल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या नाकर्तेपणाचा फायदा शिवसेनेलासुध्दा होणार आहे. परंतु शिवसेनेचे उध्दव ठाकरे, संजय राऊत, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे असे सारेच नेते पुन्हा पुन्हा आपल्या टीकेचा रोख भाजपाकडेच वळवत आहेत. भाजपा म्हणजे दिल्लीपती आणि शिवसेना म्हणजे गल्लीपती अशी विभागणी करून शिवसेना दिल्लीपतीपुढे झुकणार नाही अशा वल्गना शिवसेनेच्या नेत्यांनी सुरू केल्या आहेत. परंतु महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यांना ते कोणत्या अर्थाने दिल्लीपती म्हणत आहेत याचा काही बोध होत नाही आणि दिल्लीपतीपुढे झुकण्याची त्यांची तयारीच नसेल तर गेली २५ वर्षे भाजपाशी युती करून ते कोणत्या दिल्लीपतीपुढे झुकले होते हे काही त्यांना सांगता येत नाही. आज आपण ज्यांच्यावर टीका करत आहोत, ज्यांना भांडवलदारांचे हस्तक ठरवत आहोत त्यांच्याचबरोबर आपण २५ वर्षे काम केलेले आहे याचे भान त्यांना नाही.

उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही मोदींच्या सभांवर फार आगपाखड करत आहेत. उध्दव ठाकरेंनी असा प्रश्‍न उपस्थित केला आहे की महाराष्ट्रात मोदी लाट असेल तर मोदींच्या सभांची गरज काय? राज ठाकरे यांनी असाच सवाल केला आहे. मोदींना मुख्यमंत्री व्हायचे नाही तर मग ते प्रचार कशाला करत आहेत? उध्दव आणि राज ठाकरे यांना आता आपण काय बोलावे हेच समजेनासे झाले आहे की काय असा प्रश्‍न पडतो. मोदी यांच्या बाबतीत या दोघांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. तेच सवाल कै. बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतीत उपस्थित केले असते तर या दोघांचे उत्तर काय असणार आहे? बाळासाहेब ठाकरे निवडणुकीचा प्रचार करीत होते. त्याकाळात हिंदुत्वाची लाट होती आणि बाळासाहेबांना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. मग त्यांनी निवडणुकीचा प्रचार केला होताच ना. मग त्यावेळी तसा प्रश्‍न का निर्माण केला नाही? एकंदरीत निर्बुध्द युक्तीवाद करण्यात दोन्ही ठाकरे बंधू आघाडीवर आहेत. या दोघांचेही पक्ष बोलूनचालून प्रादेशिक आहेत. मग त्यांनी प्रादेशिक अजंेंडा मांडला तर ते साहजिक म्हणता येईल. पण नारायण राणे हे कॉंग्रेसचे नेते आहेत आणि ते सुध्दा शिवसेनेच्याच भाषेत बोलायला लागले आहेत.

त्यांनीसुध्दा मुंबई केंद्रशासितची आवई ठोकली आहे आणि महाराष्ट्रातले पैसे गुजरातेत चालले म्हणून आरडाओरडा सुरू केला आहे. नारायण राणे यांना महाराष्ट्राच्या अस्मितेची किती काळजी आहे याची कितीतरी उदाहरणे आपण अलीकडच्या सातआठ वर्षात पाहू शकतो. मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेशी दगलबाजी केली होती. त्यानंतर हा मराठी गडी मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून सोनिया गांधींच्या दारी कितीवेळा तिष्ठत बसलेला होता. या आढावा घेतला तर नारायण राणे यांची मराठी अस्मिता नेमकी कशी होती हे कळते. केवळ नारायण राणेच नव्हे तर कॉंग्रेसच्या आजवरच्या सगळ्या नेत्यांनी सत्तेच्या तुकड्यांसाठी मराठी अस्मिता मातीस मिळवून दिल्लीपतीचे जोडे पुजलेले आहेत आणि यावर अनेकदा खंतही व्यक्त केली गेलेली आहे. नारायण राणे सत्तेत तुकडा न मिळाल्यामुळे भाजपात यायला निघाले होते. त्यांना भाजपात प्रवेश मिळाला असता तर त्यांची आजची भाषा काय राहिली असती? भाजपाच्या नेत्यांना आणि नरेंद्र मोदींना टोमणे मारणारे नारायण राणे नरेंद्र मोदींची तोंड फाटेपर्यंत स्तुती करत बसले असते. नाराज असताना नारायण राणे यांनी कॉंग्रेसला वीस जागा मिळतील असे भविष्य कथन केले होते. आता मात्र उसने अवसान आणून ते कॉंग्रेसला बहुमत मिळणार अशा बढाया मारत आहेत ते सोनिया गांधींना खुश करण्यासाठीच आहे.

Leave a Comment