प्रत्यारोपित गर्भाशयात बालकाचा जन्म

pregnant
वैद्यकिय शास्त्राने अवयवांच्या प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात बरीच मजल मारली आहे. परंतु प्रत्यारोपण करून बसवलेला नवीन अवयव मूळ अवयवाएवढा सक्षम असतो का असा प्रश्‍न अनेकांना सतावत असतो. खरे म्हणजे किडनी, यकृत असे अवयव कृत्रिमरित्या बसवलेले असतात आणि ते कामचलावू ठरलेेले असते. हे अवयव ज्याच्या शरीरात बसवलेले असतात त्याचा जीव वाचतो पण त्या अवयवाची ताकद किती असा प्रश्‍न विचारला जातोच. विशेषतः अलीकडे असा प्रश्‍न प्रत्यारोपण करून बसवलेल्या गर्भाशयाच्या बाबतीत आला होता.

स्वीडनमधल्या ३६ वर्षे वयाच्या एका बाईच्या शरीरात गर्भाशयाचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. तिच्या शरीरामध्ये बिजांडकोश होता परंतु गर्भाशय नसल्यामुळे तिला अपत्यप्राती होत नव्हती. तिच्या नात्यातल्या एका महिलेला रजोनिवृत्तीनंतर गर्भाशयाची गरज उरली नाही. तिचे गर्भाशय काढून या ३६ वर्षे वयाच्या बाईच्या शरीरात बसवण्यात आले. मात्र हे कृत्रिमरित्या बसवलेले गर्भाशय या महिलेला मातृत्व प्राप्त करून देऊ शकेल का असा प्रश्‍न होता.

या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले असून त्याच गर्भाशयाच्या मदतीने ती आता आई झाली आहे. तिच्यापोटी एक मुलगा जन्माला आला असून तो पावणे दोन किलो वजनाचा आहे. तो निरोगी आहे. मात्र ही अपत्यप्राप्ती दिवस पूर्ण भरण्याच्या आधीच झाली. परंतु प्रत्यारोपित गर्भाशयाद्वारे मूल होऊ शकते हे सिध्द झाले. जगातल्या हजारो महिलांना गर्भाशय नसल्यामुळे किंवा गर्भाशयात दोष असल्यामुळे मूल होऊ शकत नाही अशा महिलांना या महिलेमुळे दिलासा मिळाला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment