देशाप्रमाणे महाराष्ट्राच्या भविष्याकरिता भाजपकडे एकहाती सत्ता द्या ! – गडकरी

nitin-gadkari
निलंगा – विकासाची दृष्टी नसलेले कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस हे राज्याला लाभलेला शाप आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही आबा, दादा व बाबा यांची प्रसिद्धी आहे का ? असा सवाल उपस्थित करून देशाप्रमाणे महाराष्ट्राच्या भविष्याकरिता भारतीय जनता पक्षाकडे एकहाती सत्ता द्या, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रचारार्थ निळकंठेश्‍वर मार्केट यार्डात आयोजित सभेत ते बोलत होते.

गडकरी म्हणाले की, शेतीला पाणी मिळावे यासाठी प्रस्तावित जलसिंचन योजनेत हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. अनेक वर्षांपासून देशावर गांधी घराण्याची सत्ता होती. मात्र मुस्लिम, दीनदलित, आदिवासी यांची गरिबी हटली नाही. देशाला नरेंद्र मोदींसारखा मजबूत पंतप्रधान लाभला आहे. त्यांनी परदेशांत देशाची शान व मान उंचावण्याचे काम केल्याचे सांगून शंभर दिवसांत ४० हजार कोटींचे रस्ते देण्याचे काम आपण केल्याचे ते म्हणाले. देशातील २५ लाख तरुणांना त्यांच्या कौशल्यावर प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्ह्यातील रस्त्याच्या दुरवस्थेसह विविध समस्या मांडल्या. आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, की मी जे बोलतो ते करतो. तुम्ही संभाजीराव पाटील यांना निवडून द्या, त्यांना मंत्री करणारच. जिल्ह्याच्या समस्येवर हाच उपाय असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

Leave a Comment