ऑनलाईन सेकंड हँड माल विक्रीलाही उत्तम प्रतिसाद

olx
दसरा दिवाळीचे दिवस म्हणजे व्यापारी लोकांसाठी घाईगर्दीचे दिवस. प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढल्याने स्नॅपडील, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या या दिवसांत व्यवसाय वाढीची अपेक्षा बाळगून असतानाच सेकंड हँड माल विक्री करणार्‍या ओएलएक्स, क्विकर सारख्या कंपन्यांनाही ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे वर्षातील एकूण व्यवसायाच्या किमान ५० टक्के व्यवसाय दिवाळीच्या दरम्यान होईल असे संकेत मिळू लागले आहेत.

ग्राहकांनीही जुन्या वस्तू विकणे कधीच इतके सुलभ नव्हते अशी प्रतिक्रिया दिली आहे. परिणामी या कंपन्यांनी त्यांचे जाहिरात बजेट १५ टक्कयांनी वाढविले आहे. ओएलएकसने स्नॅपडीलशी करार केला असून त्यानुसार ओएलएक्सवर जुन्या वस्तू विकतानाच ग्राहक त्यांच्या गरजेच्या नव्या वस्तू स्नॅपडीलवरून खरेदी करू शकणार आहेत. सेकंड हँड माल विक्री करणार्‍या या ऑनलाईन कंपन्यांची एकत्रित उलाढाल २२ हजार कोटींच्या घरात आहे त्यातील निम्मी उलाढाल दिवाळीदरम्यान होईल असा विश्वास या कंपन्यांच्या प्रमुखांनी व्यक्त केला आहे.

ओएलएक्स या अर्जेंटाईन कंपनीने भारतात व्यवसायाची सुरवात २००६ मध्ये केली असून त्यांच्या साईटवर ९७ लाख विविध उत्पादने विक्रीसाठी आहेत. त्यात वापरलेले मोबाईल, घरगुती सामान, कार यांचाही समावेश आहे. ९६ देशांत व ५५० भारतीय शहरात कंपनीचा व्यापार असून त्याचे महिन्याला ८० लाख युजर आहेत. क्विकर कंपनीकडे १ कोटी उत्पादने विक्रीसाठी आहेत आणि २००८ साली सुरू झालेल्या या कंपनीचे महिन्याला १० लाख युजर आहेत.

Leave a Comment