उस्मानाबादेत शिवसेनेची परीक्षा

vidhansabha2
विधानसभेचे चार मतदारसंघ असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात चार पैकी दोन मतदारसंघ म्हणजे उस्मानाबाद आणि उमरगा हे शिवसेनेकडे आहेत. तर उर्वरित दोन मतदारसंघांपैकी तुळजापूर कॉंग्रेसकडे आणि परंडा मतदारसंघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. या मतदारसंघांमध्ये आता फारसे बदल झालेले नाहीत. मात्र लढतीचे स्वरूप बदलले आहे आणि त्यामुळे या तीनही पक्षांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. विधानसभेची ही निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीतील शिवसेनेच्या देदिप्यमान विजयाच्या पार्श्‍वभूमीवर होत आहे. ज्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीचे प्रा. रवींद्र गायकवाड हे माजी गृहमंत्री आणि माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर अडीच लाखांनी मात करून निवडून आले आहेत. तिथे आता ही लढत होत असल्यामुळे शिवसेनेच्या गोटात आत्मविश्‍वासाचे वातावरण आहे. परंडा आणि तुळजापूर हेही दोन मतदारसंघ जिंकून घेण्याच्या इर्ष्येने शिवसैनिक कामाला लागले आहेत.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत उस्मानाबाद या मतदारसंघात ओमराजे निंबाळकर हे निवडून आले होते आणि त्यांनी डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह यांचा पराभव केला होता. यावेळी भाजपाचेही उमेदवार या मतदारसंघात उभे आहेत आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून राणा जगजितसिंह मैदानात उतरले आहेत. भाजपाचे संजय दुधगावकर आणि कॉंग्रेसचे विश्‍वास शिंदे हे उभे आहेत मात्र त्यांचा फारसा प्रभाव या निवडणुकीत दिसणार नाही. उमरगा हा राखीव मतदारसंघ हाही सध्या शिवसेनेकडे आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले निवडून आले होते. ते पुन्हा उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे किसन कांबळे आणि भाजपाचे कैलास शिंदे निवडणूक लढवत आहेत. डॉ. संजय गायकवाड यांनी या मतदारसंघातून कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. ते रिपब्लिकन युवा आघाडीचे जुने कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी कॉंग्रेसकडे तिकिटाची मागणी केली आहे. परंतु त्यांना तिकिट मिळविण्यात त्यांना यश आले नाही. म्हणून ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर उभे आहेत.

तुळजापूर मतदारसंघ हा कॉंग्रेससाठी प्रतिष्ठेचा ठरला आहे. कारण तिथून कॉंग्रेसचे ज्येष्ठ मंत्री मधुकरराव चव्हाण हे सलग तिन वेळा निवडून आले आहेत. त्यांचे या मतदारसंघावर वर्चस्व असले तरी मतदारसंघाची पुनर्रचना होऊन उस्मानाबाद तालुक्यातली ७० गावे तुळजापूर मतदारसंघाला जोडलेली असल्यामुळे त्यांच्या वर्चस्वाला धक्का पोहोचलेला आहे. २००९ साली त्यांच्या विरोधात भाजपाचे माजी खासदार सुभाष देशमुख हे उभे होेते. त्यांना या ७० गावांनी चांगलीच साथ दिली. मात्र तुळजापूर भागाच्या वर्चस्वाच्या जोरावर मधुकरराव चव्हाण निवडून आले. यावेळी या मतदारसंघात भाजपाने संजय निंबाळकर यांना उभे केले आहे आणि कॉंग्रेसची आघाडी फुटल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार जीवनराव गोरे हेही उभे आहेत. जीवनराव गोरे हे शरद पवार यांचे नातेवाईक असून एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष आहेत. त्याशिवाय शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील हेही मैदानात उतरलेले आहेत. या सगळ्या मातब्बर उमेदवारांमध्येच देवानंद रोचकरी हे मनसेच्या तिकिटावर उभे आहेत. रोचकरी हे तुळजापूरचे वेगळेच प्रकरण आहे. त्यांच्यामागे काही विशिष्ट मतदार आहेत. त्यांच्या जोरावर ते निवडणुका लढवतात. मात्र कोणत्याच एका पक्षात राहत नाहीत. पूर्वी शेका पक्षात होते. नंतर शिवसेनेत आले आणि आता मनसेतून उभे आहेत. तुळजापूर मतदारसंघातील या पंचरंगी निवडणुकीत देवानंद रोचकरी आणि मधुकरराव चव्हाण हे तुळजापूर भागातल्या मतांची विभागणी करतील तर उस्मानाबाद तालुक्यातल्या ७० गावांमध्ये जीवन गोरे, सुधीर पाटील आणि संजय निंबाळकर यांच्यात विभागणी होईल. या विभागणीचा फायदा मधुकरराव चव्हाण यांना होईल असे आज तरी वाटते.

महाराष्ट्रातला सर्वाधिक उपेक्षित तालुका म्हणजे परंडा. भूम आणि परंडा या दोन तालुक्यांचा एक मतदारसंघ तयार झालेला आहे. तिथे एकेकाळी ज्ञानेश्‍वर पाटील हे शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले होते. नंतर या मतदारसंघात शिवसेनेने बाहेरचा उमेदवार उभा केला. त्याने मतदारसंघाशी फार संपर्क ठेवला नाही. परिणामी हा मतदारसंघ शिवसेनेच्या हातातून निसटला आणि राहुल मोटे या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याच्या हाती लागला. हे राहुल मोटेसुध्दा शरद पवारांचेच नातेवाईक आहेत. ते पुन्हा उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात शिवसेनेचे ज्ञानेश्‍वर पाटील हेसुध्दा निवडणूक लढवत आहेत. कॉंग्रेसचे नुरुद्दीन चौधरी हे मैदानात असले तरी त्यांचा फार प्रभाव नाही. एकंदरीत या मतदारसंघात नेमका कोण निवडून येईल याचा काही अंदाज येत नाही.

Leave a Comment