राज्यात कोणत्याही एका पक्षाला सत्ता मिळणार नाही : नाना पाटेकर

nana
पुणे – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वकाही अतिशय विचित्र पद्धतीने सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी गळयात गळे घालून मिरवणारे आता एकमेकांची उणीदुणी काढत आहेत. या सर्व प्रकाराकडे मतदार हतबलतेने पाहत आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही एका पक्षाला सत्ता मिळणार नाही, असे मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. आगामी “डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रियल हिरो’ या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत पाटेकर बोलत होते.

राजकारणात कोणीही कधीच कोणाचा शत्रू नसतो हे सामान्य जनतेला माहिती आहे. तरीही सर्वच नेते आज गरळ ओकत आहेत त्याची गरज काय? असा सवाल उपस्थित करत पाटेकर म्हणाले की, एका पिढीचा दुसऱ्या पिढीशी संवाद होत नाही हे दुदैवी आहे. शरद पवार यांचा मी आदर करतो. अत्यंत अभ्यासू आणि व्यासंगी असे ते आहेत. अशा व्यक्‍तीचा पुढची पिढी उपयोग करून घेत नसेल तर दुदैव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वक्‍तृत्त्वशैली उत्तम आहे. जे बोलतात ते आतून बोलतात. पण मी या निवडणुकीत कोणाचाही पुरस्कार करणार नाही. मतदारांनी आणि तरूणांनी कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी न पडता, सारासार बुद्धीचा वापर करून आपला लोकप्रतिनिधी निवडावा, गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या, भ्रष्टाचारी उमेदवाराला मत देऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शिनसेना आणि मनसेच्या एकत्रीकरणाविषयी विचारले असता पाटेकर म्हणाले, निवडणुकीसाठी किंवा निवडणुकीनंतर एकत्र यायचे की नाही हे राज आणि उद्धव ठाकरे ठरवतील. दोघेही सामजंस आहेत, त्यांना त्यांचे भलेबुरे कळते त्या विषयावर आपण चर्चा करण्यात अर्थ नाही. राज्याचा मुख्यमंत्री पारदर्शी असावा आणि भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करण्याचे धाडसही त्याच्याकडे असायला हवे असेही त्यांनी सांगितले. राजकारण हा माझा पिंड नाही. ज्याचे काम त्याचे त्यानेच करावे, असे माझे मत आहे. मला नाटक, चित्रपटात आणखी बराच पल्ला गाठायचा असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

Leave a Comment