भारतीय महिला मुष्टियोद्धा सरिता देवीवर कारवाई नाही

sarita-devi
इंचियोन – इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान आक्षेपार्ह वर्तनाबद्दल भारतीय महिला मुष्टियोद्धा सरिता देवीवर आशियाई ऑलिम्पिक समितीने (ओसीए) कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. सरिताने आपल्या वर्तणूकीबाबत माफी मागितल्याने तिला सोडून देण्यात यावे, असा निर्णय समितीने घेतला असल्याचे कळते.

सरिता देवीचे वर्तन अशोभनीय होते. तथापि, हे वर्तन पूर्वनियोजित नसून, भावनेच्या भरात केलेले होते. या वर्तनाबद्दल तिने ओसीएकडे माफीनामा सादर केला आहे. त्यामुळे तिच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असे ओसीएचे उपाध्यक्ष वेई जिझाँग यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे, हे वर्तन व्यक्तिगत असल्याने भारतीय पथकावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचेही ‘ओसीए’ने स्पष्ट केले. पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे सरिताला आशियाई स्पर्धेतील ५७ ते ६० किलो गटाच्या उपांत्य लढतीत दक्षिण कोरियाच्या जिना पार्कविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने, ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. याचा निषेध करताना सरिताने पदक प्रदान सोहळ्यामध्ये ब्राँझपदक गळ्यात घालण्यास नकार दिला. त्यानंतर, तिने हे पदक रौप्यपदक विजेत्या जिना पार्कच्या गळ्यात घालून व्यासपीठ सोडले होते.

Leave a Comment