
मुंबई- भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा करायचा असून हा आमचा प्रमुख अजेंडा आहे, असा ठाम इरादा व्यक्त केला. गेल्या २० वर्षांपासून विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करण्याची भाजपची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेसने आंध्र प्रदेशातून तेलंगणा वेगळा करताना जनतेला अंधारात ठेवले तसे आम्ही करणार नाही. आम्ही सर्वांच्या सहमतीने महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करू. कृपा करून याला कोणीही दोन भाऊ वेगळे होत आहेत असा भावनिक रंग देऊ नये, असे आवाहन केले.
विदर्भ वेगळा हा भाजपचा प्रमुख अजेंडा
फडणवीस यांनी भाजपची आगामी पावले कोणत्या दिशेने पडतील हे एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. तुम्ही शिवसेनेसोबतची युती तोडल्यामुळे शिवसेना तुमच्या सोबत नाही. विधानसभा निवडणुकीत जर भाजप बहुमताच्या दिशेने गेला तर तुम्ही वेगळा विदर्भ करणार काय? असा प्रश्न त्यांना विचारताच फडणवीस म्हणाले, होय, निश्चितच. मोठ्या राज्यांची दोन शकले करून छोटी राज्ये बनवावीत हीच भाजपची विचारसरणी आहे.
